Mumbai: कोवळे हात चुकीच्या वाटेवर, बालगुन्हेगारीच्या संख्येत वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 17:16 IST2025-06-16T17:15:01+5:302025-06-16T17:16:37+5:30
Mumbai Juvenile Crime: मुंबईत बालगुन्हेगारीच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Mumbai: कोवळे हात चुकीच्या वाटेवर, बालगुन्हेगारीच्या संख्येत वाढ!
मुंबई : हलाखीची कौटुंबिक स्थिती, पालकांचे दुर्लक्ष, लागलेली वाईट संगत आणि जडलेली व्यसने त्यात नेटवर्किंगचे वाढते जाळे यामुळे अनेक अजाण बालके गुन्हेगारीच्या वाटेकडे वळताना दिसत आहेत. यात मुख्यत्वेकरून झोपडपट्टी, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांसोबतच उच्चभ्रू वस्तीतील मुलेही गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक बालगुन्हेगार हे त्यांच्या कुटुंबासोबत राहून गुन्हे करत आहेत. त्यामुळे पालकांनी वेळीच सतर्क होत पाल्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच महिन्यांत मुंबईत एकूण २२१८१ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी १६,२२४ गुन्ह्यांची उकल झाली. गेल्यावर्षी याच महिन्यात २३,१३६ गुन्हे नोंद होते. यामध्ये हत्या (६४), हत्येचा प्रयत्न (१२६), बलात्कार (४८५), विनयभंग (१०९५), चोरी (३०३२) सह विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. या दाखल गुन्ह्यांमध्येही अल्पवयीन गुन्हेगारांचाही समावेश आहे. एनसीआरबीच्या अहवालातून देशातील बालगुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. खून, वाहनचोरी, बलात्कार, चोऱ्या अशा एक ना अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकू पाहणाऱ्या बालकांना रोखणारी सामाजिक व्यवस्थादेखील लोप पावत आहे. त्यामुळे झोपडपट्टी भागातील लहान मुलांबरोबरच उच्चभ्रू समाजातील मुलेही गुन्हेगार म्हणून पुढे येत आहेत.
आपले पाल्य काय करते, याकडे पालकांचे लक्ष हवे?
बालगुन्हेगारीत सापडलेल्या मुलांमध्ये कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या मुलांचेही प्रमाण चिंताजनक होते. त्यामुळे पालकांनी आपला पाल्य काय करतो?
तो कुणाच्या संपर्कात आहे? त्याचे मित्र कोण? अशा अनेक गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे, असे आवाहन पोलिसांकड़ून वेळोवेळी करण्यात येत आहे.
मौजमजेसाठीही चोरी
मौजमजा तसेच आलिशान लाइफ स्टाइल जगण्यासाठी तसेच स्टेट्सच्या नावाखालीही काही कोवळे हात गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहेत.