जोगेश्वरी येथे किरकोळ वादातून चक्क वाहन चालकाला पेटवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 09:40 IST2026-01-13T09:40:37+5:302026-01-13T09:40:49+5:30
आरोपी नागेंद्र यादव विरोधात आंबोली पोलिसांत गुन्हा दाखल

जोगेश्वरी येथे किरकोळ वादातून चक्क वाहन चालकाला पेटवले
मुंबई : जोगेश्वरी पश्चिम परिसरात एका किरकोळ वादातून राजेंद्र जयराम यादव (४४) या वाहन चालकावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याना पेटवण्याचा गंभीर प्रकार १० जानेवारी रोजी घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी नागेंद्र यादव (२२) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र यादव हे जोगेश्वरीत वास्तव्यास असून, त्यांच्यासोबत मुलगा शिवम (१५) आणि पुतण्या मितलेश (२०) राहतात. तक्रारीनुसार, १० जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास राजेंद्र यादव कामावरून घरी परत येत असताना त्यांना त्यांचा पुतण्या पंकज (२२) याचा नागेंद्र यादव याच्याशी सिगारेटच्या पैशांवरून वाद झाल्याचे दिसले. पंकज हा पानटपरी चालवतो. नागेंद्र नशेत असल्याचे पाहून राजेंद्र यादव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रकरण चिघळले. स्थानिक नागरिकांनी समजावून सांगितल्यानंतर नागेंद्र तिथून निघून गेला. परंतु, थोड्यावेळाने परत येत राजेंद्र बेसावध असताना त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून दिले. त्यात राजेंद्र यादव गंभीर भाजले. उपस्थित नागरिकांनी आग विझवली. दरम्यान, नागेंद्र तेथून पळून गेला. गंभीर जखमी राजेंद्र यादव यांना शेजारी राहणाऱ्या मनोज यादव यांनी दुचाकीवरून प्रथम ट्रॉमा केअर व त्यानंतर मल्लिका हॉस्पिटल, जोगेश्वरी पश्चिम येथे दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेप्रकरणी नागेंद्र याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याचा आरोप आहे.