Join us
Daily Top 2Weekly Top 5

Jitendra Awhad: किणी खूनप्रकरणात बाळासाहेबांना कुठे जावे लागले होते?, आव्हाडांनी जुनं उकरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 08:07 IST

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तीन मोठ्या नेत्यांच्या इन्कम टॅक्स, ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणामार्फत चौकशा सुरू आहेत.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे बुधवारी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना झालेली अटक आणि पाठोपाठ शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या मालमत्तांवर मंगळवारी ईडीने आणलेली टाच, या घटनांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय मूल्य प्राप्त झाले होते. या भेटीनंतर मनसेनं निशाणा साधला असून राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनीही जुनं प्रकरण उकरुन काढलं आहे.

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तीन मोठ्या नेत्यांच्या इन्कम टॅक्स, ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणामार्फत चौकशा सुरू आहेत. अजित पवार, संजय राऊत आणि नवाब मलिक या नेत्यांवर छापे पडून त्यांच्या मालमत्ताही जप्त झाल्या. यावरून आता मनसेने जोरदार निशाणा साधला आहे. त्यावर, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन किनी खून प्रकरणाचा संदर्भ दिला आहे. मनसे अधिकृतनं केलेल्या ट्विटला आव्हाड यांनी हे उत्तर दिलंय. 

शरद पवार आणि पंतप्रधान भेटीवर @mnsadhikrut ने प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, विस्मृती ही देवाने माणसाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्यावरुन, आव्हाड यांनी मनसेला टोला लगावला आहे. किणी खून प्रकरणात स्वर्गीय बाळासाहेबांना कुठे-कुठे जावे लागले होते, हे आमच्या स्मृतीत आहे, असे म्हणत जुनं प्रकरणं उकरुन काढत मनसेला लक्ष्य केलं आहे.   

माझ्या पुतण्याला वाचवा - देशपांडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या या भेटीवर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनीही प्रतिक्रिया दिली. "दिल्लीत काल 'माझ्या पुतण्याला ED पासून वाचवा' अशा आर्त हाका ऐकू आल्या" असं म्हणत खोचक टोला लगावला. देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "1773 साली "काका मला वाचवा" अशा आर्त हाका शनिवार वाड्यात लोकांनी ऐकल्या होत्या. थोड्याशा वेगळ्या संदर्भात "माझ्या पुतण्याला वाचवा" अशा आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या" असं म्हणत संदीप देशपांडे यांनी हल्लाबोल केला आहे. 

पवार भेटीनंतर 3 मुद्दे चर्चेत

पंतप्रधानांशी केलेल्या चर्चेदरम्यान पवार यांनी उपस्थित केलेल्या तीन मुद्द्यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राऊत यांच्या संपत्तीवर आलेली टाच, विधान परिषदेत आमदारांच्या नियुक्तीला राज्यपालांकडून होत असलेला विलंब आणि लक्षद्वीपमध्ये राज्यपाल प्रफुल्ल कोडा पाटील यांचा मनमानी कारभार हे तीन मुद्दे पवारांनी उपस्थित केले. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत फूट पडणार नाही, उलट अधिक मजबुतीने सरकार चालवले जाईल, असा संदेशच पवार यांनी या भेटीतून दिल्याचे बोलले जाते.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेजितेंद्र आव्हाडबाळासाहेब ठाकरे