Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पवारांचे दूत' राज ठाकरेंच्या भेटीला, आव्हाडांची 'कृष्णकुंज'वर दोन तास चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 14:30 IST

समविचारी पक्षांनी एकत्र यावं, अशी साद घालून भाजपाविरोधी पक्षांना एकत्र येण्याचं जाहीर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेलं असतानाच, त्यांचे खास शिलेदार मानले जाणारे जितेंद्र आव्हाड आज 'कृष्णकुंज'वर पोहोचल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई - समविचारी पक्षांनी एकत्र यावं, अशी साद घालून भाजपाविरोधी पक्षांना एकत्र येण्याचं जाहीर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेलं असतानाच, त्यांचे खास शिलेदार मानले जाणारे जितेंद्र आव्हाड आज 'कृष्णकुंज'वर पोहोचल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आव्हाड यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील कळू शकला नसला, तरी ही केवळ सदिच्छा भेट नव्हती, याबद्दल राजकीय वर्तुळात दुमत नाही.  

लोकसभा निवडणुकीला वर्ष शिल्लक असलं तरी देशभरात सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी, जुळवाजुळव सुरू केली आहे. भाजपाविरोधी सर्व पक्षांना एकत्र आणण्यासाठी काही प्रमुख नेते सक्रिय झालेत आणि त्यात शरद पवार सगळ्यात पुढे आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेनेलाही महाआघाडीसोबत येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यांची ही ऑफर  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल वर्धापनदिन मेळाव्यात नाकारली होती. त्यानंतर आज लगेचच जितेंद्र आव्हाड सकाळी-सकाळी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. 

वास्तविक, राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड आजवर अनेकदा शाब्दिक चकमक उडाली आहे. काही वर्षांपूर्वी, राज ठाकरे हा नेता नव्हे, तर कॉमेडियन आहे, अशी खिल्ली आव्हाडांनी उडवली होती. त्याला राज यांनीही आपल्या स्टाइलमध्ये उत्तर दिलं होतं. परंतु, अलीकडच्या काळात त्यांच्यात स्नेहबंध जुळताना दिसू लागले होते. राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवल्यानंतर, आव्हाड यांना त्यांच्यातील विविध गुणांची जाणीव होऊ लागल्याचं दिसतंय. 

राज ठाकरे यांचा व्यासंग, विविध विषयांचा अभ्यास कौतुकास्पद आहे. त्यांनी नाट्यसंमेलनात केलेलं भाषणही प्रभावित करणारं होतं. त्यामुळे त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर मस्त गप्पा रंगल्या, असं जितेंद्र आव्हाड यांनी राज यांच्या भेटीनंतर सांगितलं. राजकीय विषयावर नेमकं काय बोलणं झालं, याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगलंय. परंतु, पवारांच्या अनाकलनीय राजकारणाचा विचार करता, या भेटीमागे काय 'राज' असेल, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

राजकारणात कधीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, या वाक्याची प्रचिती आता निवडणुका होईपर्यंत येतच राहणार आहे.

टॅग्स :राज ठाकरेमनसेजितेंद्र आव्हाडशरद पवार