Jitendra Awhad on Akshay Shinde Encounter: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाने गेल्या काही दिवसांपासून महाष्ट्रातलं वातावरणं चांगलेच तापलं आहे. दोघांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी अनेक ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधकांकडून मोर्चे काढण्यात येत आहे. सोमनाथ सूर्यवंशी आणि सरपंच संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईत भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस खात्यावरून सरकारवर निशाणा साधला. तसेच बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने बलात्कार केला नसल्याचा दावा आव्हाड यांनी केला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी मुंबईत सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्च्यानंतर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेबाबत मोठा दावा केला. बलात्कार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेंची हत्या झाली असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. गेल्या आठवड्यात अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे कोर्टाने आदेश दिल्यानंतर हे प्रकरण तापलं आहे. अशातच कोर्टाच्या निर्णयाचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस यंत्रणेत होत असलेल्या हस्तक्षेपावर भाष्य केलं.
"अक्षय शिंदेला मारलं. शासकीय यंत्रणा जेव्हा पोलिसांमध्ये हस्तक्षेप करायला लागते तेव्हा पोलिसांनाच बदनाम करतात. अक्षय शिंदेला ज्या अंतरावरून गोळी मारली ते पाहिलं तर ते हास्यास्पद वाटेल. त्याच्या हाताला बेड्या होत्या असं म्हणतात. मग तो कोणाचं रिव्हॉल्वर काढणार. अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही. केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली. बलात्कार केलेले अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर ते कसे काय हजर झाले. अक्षय शिंदेला जिथे मारलं तो मतदारसंघ माझा आहे. त्याला जिथे मारलं तिथे एक चहा वाला बाजूला उभा होता. त्याने मला फोन करून सांगितलं की इथे काहीतरी होणार आहे. त्यानंतर अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याची माहिती समोर आली," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
"अक्षय शिंदेला गोळ्या घालणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा असं कोर्टाने सांगितलं आहे. अक्षय शिंदेच्या प्रकरणात अजून पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. मुंबईचे पोलीस काय करू शकतात हे दाऊदला सर्वात जास्त माहिती आहे. म्हणूनच आज तो दुबईमध्ये बसला आहे. पोलीस खात्याची बदनामी गेल्या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांनी केली. पोलीस यंत्रणेत हस्तक्षेप केल्यामुळे ते एकही काम करू शकत नाही," असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.