सिगारेटच्या बहाण्याने लाखोंचे दागिने पळवले; माथेरानमधील दुकानात घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 11:55 IST2026-01-18T11:55:25+5:302026-01-18T11:55:25+5:30
चौघांवर गुन्हा दाखल

सिगारेटच्या बहाण्याने लाखोंचे दागिने पळवले; माथेरानमधील दुकानात घडली घटना
माथेरान शहरात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिवाजी रोड परिसरातील वन ट्री हिल पॉइंटजवळ असलेल्या कदम टी स्टॉलमध्ये थरारक जबरी चोरीची घटना घडली.
चार अज्ञात चोरट्यांनी सिगारेट खरेदीच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करत चाकू-सुऱ्याचा धाक दाखवून दुकानमालक नारायण मारुती कदम, त्यांच्या पत्नी चंदा यांना दोराने बांधून ठेवले. त्यानंतर घरातील एक लाख रोख तसेच सात ते आठ तोळे सोन्याचे दागिने लंपास करून चोरटे फरार झाले.
कदम टी स्टॉल व त्यांचे घर एकाच ठिकाणी असल्याने नारायण कदम हे पत्नीसमवेत तेथेच वास्तव्यास आहेत. दुकान बंद करून दाम्पत्य घरात बसले असताना ४ चोरटे दुकानात शिरले. काही क्षणांतच त्यांनी चाकूचा धाक दाखवत दोघांनाही बांधून घराची झडती घेतली. मौल्यवान ऐवज घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे दाम्पत्याला धक्का बसला.
सीसीटीव्हीद्वारे तपास
घटनेची माहिती मिळताच माथेरानचे प्रभारी अधिकारी अनिल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध पोलिस घेत आहेत.
कामांनिमित्त दररोज ३०० ते ४०० जणांची ये-जा
माथेरानमधील अनेक पॉइंट व बंगले गावापासून दूर व एकाकी ठिकाणी असल्याने अशा प्रकारच्या घटनांचा धोका वाढत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. या घटनेनंतर व्यापारी व स्थानिक रहिवाशांमध्ये सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त होत आहे. कामानिमित्त रोज बाहेरून येणाऱ्या कामगार, गडी यांच्यावर कोणतेही बंधन किंवा नोंद नसल्याने गुन्हेगारीला वाव मिळत असल्याची नागरिकांची भावना आहे. गावात कोणाचे पाहुणे आले की, प्रवेशद्वार येथून चौकशी केली जाते, मात्र पर्यटक सोडून दररोज ३०० ते ४०० बाहेरील लोक विविध कामासाठी ये-जा करतात. त्यांच्यावर कोणताही तपास किंवा कर आकारला जात नाही. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कामगारांचे ओळखपत्र तपासणे, त्यांची नोंद ठेवणे तसेच दस्तुरी नाक्यावर प्रवेश फी आकारावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.