जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 14:39 IST2025-12-26T14:38:40+5:302025-12-26T14:39:09+5:30
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ नगरसेवक मुंबईत निवडून आले होते. त्यामुळे किमान २०- २५ जागांची मागणी राष्ट्रवादीची आहे.

जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
मुंबई - महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने स्वबळावर लढण्याचं जाहीर करताच नुकतीच ठाकरे बंधू यांनी युतीची घोषणा केली. आता शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूच्या युतीत जाणार की काँग्रेससोबत जाणार असा प्रश्न आहे. राष्ट्रवादीकडून ठाकरे बंधू यांना काही जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र इतक्या जागा सोडण्यास ठाकरे बंधू तयार नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते काँग्रेससोबतही चर्चेला पोहचले होते. मात्र आता पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहचले.
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ नगरसेवक मुंबईत निवडून आले होते. त्यामुळे किमान २०- २५ जागांची मागणी राष्ट्रवादीची आहे. राष्ट्रवादीचे मुंबई पदाधिकारी ठाकरे बंधूंसोबत जाण्यास इच्छुक आहेत परंतु इतक्या जागा राष्ट्रवादीला सोडणे शक्य नाही असं ठाकरेंचे नेते सांगत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहचले आहेत. जयंत पाटील यांच्यासोबत मुंबई अध्यक्षा राखी जाधव यादेखील उपस्थित आहेत. त्यामुळे काही जागांचा जो तिढा आहे त्यावर तोडगा काढून ठाकरे बंधू यांच्या युतीसोबत निवडणूक लढवण्याचा राष्ट्रवादीचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येते.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. मात्र मुंबईत महाविकास आघाडी कायम राहावी, त्यात मनसेही असावी असा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून केला जात होता. परंतु राज ठाकरे यांच्या मनसेच्या एन्ट्रीमुळे काँग्रेसने ठाकरे बंधू यांच्या आघाडीपासून दूर राहण्याचा निर्णय घेत स्वबळाची तयारी केली. मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी कुणासोबत जाणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र त्याआधीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. त्यात या दोन्ही पक्षांमधील जागावाटप पूर्ण झाल्याचे बोललं जात आहे. मात्र यात राष्ट्रवादीलाही काही जागा सोडण्याची तयारी ठाकरे बंधूंची आहे. परंतु किती जागा सोडाव्यात आणि कोणत्या जागांबाबत तिढा आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी आज जयंत पाटील उद्धव ठाकरेंची चर्चा करत आहेत.