Join us

Jayant Patil: 'माझं ते म्हणणं रेकॉर्डवरुन काढून टाकावं', अखेर जयंत पाटलांची विधानसभेत विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 19:39 IST

जयंत पाटील यांनी झिरवळ यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून भाजपाने त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

मुंबई - विधानसभा अध्यक्षपदी भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर १६४ मतांसह विजयी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला. यावेळी एकनाथ शिंदेंनी राहुल नार्वेकर यांच्या आजवर केलेल्या कामांचा दाखला दिला. याच दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी नरहरी झिरवळ यांच्या कामाचं कौतुक केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी "आदिवासी असून देखील नरहरी झिरवळ यांनी चांगलं काम केलं" असं विधान केलं होतं. यावरुन, आता त्यांनी एक पाऊल मागे घेत हे विधान अनावधानाने आल्याचे सांगितले आहे. 

जयंत पाटील यांनी झिरवळ यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून भाजपाने त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तर, सोशल मीडियातूनही त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला आहे. "सत्ता गेली पण माज जात नाही" असे म्हणत भाजप नेते गोपीचंद पडळकर (BJP Gopichand Padalkar) यांनी एक ट्विट केलं आहे. "आदिवासी असूनही चांगलं काम केलं या विधानाचा अर्थ काय? जातीयवाद यांच्या मनात रुजलेला आहे. मी तमाम दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त बांधवांच्या वतीने या विधानाचा जाहीर निषेध करतो. सत्ता गेली पण माज जात नाही" अशी घणाघाती टीका पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केली.  दरम्यान, सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांची ही चूक निदर्शनास आणून दिली. त्यानंतर, जयंत पाटील यांनी, आपलं हे विधान अनावधानाने आलं असून आपला तसा हेतू नव्हता, असे म्हटले आहे. तसेच, हे विधान रेकॉर्डवर घेऊ नये, अशी विनंतीही विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यामुळे, आता या गोष्टीवर पडदा पडला आहे. पाटील यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुनही यासंदर्भात माहिती दिली.  

 

टॅग्स :जयंत पाटीलभाजपानरहरी झिरवाळराष्ट्रवादी काँग्रेस