प्रिस्क्रिप्शनवर आता शुद्ध हवा असे लिहून देण्याची आली आहे वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 01:51 AM2021-04-18T01:51:48+5:302021-04-18T01:51:54+5:30

पर्यावरण तज्ज्ञ;  महाराष्ट्रात दरवर्षी १.८ लोकांचा हवा प्रदूषणाने मृत्यू

It's time to dump her and move on | प्रिस्क्रिप्शनवर आता शुद्ध हवा असे लिहून देण्याची आली आहे वेळ

प्रिस्क्रिप्शनवर आता शुद्ध हवा असे लिहून देण्याची आली आहे वेळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात हवा प्रदूषणामुळे दरवर्षी ७० लाख लोक मरण पावतात. महाराष्ट्रात दरवर्षी १.८ लाख लोकांना प्रदूषित हवेमुळे मृत्यूला सामोरे जावे लागते. कोरोना हा श्वसनाचा आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशात हवेची गुणवत्ता गाठू न शकणारी सर्वाधिक म्हणजे १९ शहरे महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोनानंतर सर्वात मोठी महामारी हवा प्रदूषणाच्या रूपाने येईल, अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘हवा प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम’ या नुकत्याच झालेल्या ऑनलाइन वेबिनारमध्ये विविध तज्ज्ञ सहभागी झाले होते. 
यावेळी मुंबईच्या डॉ. अदिती शहा यांनी सांगितले,  गेल्या १० वर्षांत लहान मुलांमध्ये अशा प्रकारच्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्दी, पडसे आणि खोकला यांचे लहान मुलांमध्ये जास्त प्रमाण आढळून येते. आम्ही त्यांना औषधे लिहून देतो. मात्र, याचे वाढते प्रमाण पाहता, आता प्रिस्क्रिप्शनवर शुद्ध हवा असे लिहून देण्याची वेळ आली आहे. प्रदूषित हवेमुळे लहान मुलांच्या मेंदूचा विकास होण्याच्या प्रक्रियेत बाधा येते. त्यामुळे एखादी गोष्ट अधिक काळ लक्षात न राहणे, विसर पडणे अशा समस्यांनाही मुलांना सामोरे जावे लागते आहे.
पुण्यातील डॉ. संदीप साळवी म्हणाले की, घरात आपण एक मच्छरची काॅईल जाळतो. त्यातून निघणारा धूर जवळपास १०० सिगारेट्स ओढल्यावर जेवढे घातक प्रदूषण शरीरात जाते तेवढे घराच्या आत निर्माण करताे. केवळ औद्योगिक क्षेत्रातून, वाहनांतून हवा प्रदूषण होत आहे, असे समजणे चूक ठरेल. आपणही यात व्यक्तिगत भर घालतो, हे प्रत्येकाने मान्य करायला हवे.
मुंबईच्या डॉ. अमिता आठवले यांनी सांगितले की, घरातील प्रदूषण आरोग्याला धोका निर्माण करणारे मुख्य कारण ठरत आहे. आपण मोठमोठ्या उद्योगधंद्यांसाठी नियमावली बनवू शकतो, मात्र लहान उद्योगांसाठी ते करता येत नाही. 
या प्रदूषणाला वेळीच आळा घालण्याची गरज!
नागपूरचे डॉ. समीर अर्बट म्हणाले, आज कोरोना महामारीने संपूर्ण जग वेठीस धरले आहे. हवा प्रदूषण आणि कोरोना याचा थेट संबंध स्पष्ट झाला नसला, तरीही येणाऱ्या काळात कोरोनानंतर सर्वात मोठी महामारी हवा प्रदूषणाच्या रूपाने येईल, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे हवा प्रदूषणाच्या धोक्याला वेळीच आळा घालणे महत्त्वाचे आहे.

Web Title: It's time to dump her and move on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.