"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:06 IST2025-11-18T16:04:59+5:302025-11-18T16:06:57+5:30
ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाक् युद्ध सुरू झाले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच दोन्ही पक्षांमध्ये ठिणगी पडली होती. तो वाद वाढू लागला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने सामनातून काँग्रेसला उपदेशाचे डोस दिल्यानंतर काँग्रेसनेही पलटवार केला.

"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
Shiv Sena UBT Congress: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीला तडे जाताना दिसत आहे. निकाल जाहीर होतातच ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला वृत्ती बदला म्हणून सल्ला दिला होता. काँग्रेसकडून त्याला उत्तर दिलं गेलं. त्यानंतर आता हा वाद वाढला असून, सामना अग्रलेखातून काँग्रेसला सल्ला दिला गेला. त्याला उत्तर देताना अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत खडेबोल सुनावले.
खासदार संजय राऊत यांचे जुने विधान पोस्ट करत सचिन सावंत यांनी मनसे-शिवसेना वाढत्या जवळकीवर बोट ठेवले.
"सामनामधील सल्ला वाचला. जुलै महिन्यात महाराष्ट्र विकास आघाडीची गरज नाही, असे म्हटले तेव्हा कदाचित असा सल्ला देण्याची गरज भासेल यांची जाणीव झाली असती तर बरे झाले असते. मनसे आणि शिवसेना (उबाठा) यांच्या जवळीकीच्या चर्चा आम्ही ऐकत होतो. पण आमचे राजकीय मतभेद असू शकतात याची जाणीव ठेवणे गरजेचे होते", अशा शब्दात सचिन सावंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सुनावले आहे.
महाराष्ट्रातही तसाच निकाल आला होता
"जर सुरुवातीलाच सांगितले असते तर आधीच आमची भूमिका स्पष्टपणे सांगितली असती. राहता राहिला बिहारचा निकाल - तो सर्व विरोधी पक्षांना संदेश आहे. महाराष्ट्रात ही विधानसभा निवडणुकीत तसाच निकाल आला होता", असेही सावंत म्हणाले.
"याचसाठी भाजपाचा पराभव केला पाहिजे यात शंका नाही पण त्यासाठी सर्व तत्वे गुंडाळून ठेवतात येणार नाहीत. काँग्रेस पक्ष प्रत्येक हिंसात्मक राजकारणाचा, विद्वेषाचा विरोध करतो. तो धार्मिक असो जातीय असो वा भाषिक...", असे म्हणत सचिन सावंत यांनी मनसेवर टीका केली आहे.
भाजपला विरोध करताना इतरांचे...
"कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे भाजपाचा विरोध करताना इतरांचे विद्वेष पूर्ण राजकारण योग्य ठरवता येत नाहीत. भाजपाचा पराभव करणे म्हणजे भाजपाच्या असंविधानिक लोकशाही विरोधी धर्मांध नीती व कृतीचा विरोध करणे. त्यासाठी आपल्याला स्वतःला संविधान व लोकशाही खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे स्विकारावी लागेल", अशा शब्दात सचिन सावंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सुनावले आहे.