Join us  

"भाजपसोबत जाऊन अजित पवार गटाची बुद्धी भ्रष्ट होतेय वाटतं"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 7:04 PM

महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई/जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी अचाकन मंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यातील राजकीय वर्तुळात भूकंप घडला. अजित पवार यांच्या नेतृत्त्वात हा शपथविधी सोहळा पार पडला. त्यात, जळगाव जिल्ह्यातील अनिल पाटील यांनाही मंत्रीपदाची संधी मिळाली. मंत्रिपद मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी प्रथमच अमळनेर येथे आलेले अनिल पाटील हे लोणे येथे गाववेशीजवळ पोहचतात भूमीवर डोके टेकवात नतमस्तक झाले. तर, अमळनेरमध्ये त्यांचे जल्लोषात स्वागतही झाले. मात्र, त्यांचा हा स्वागत सोहळा वादग्रस्त ठरत आहे.  

मंत्री अनिल पाटील यांचे  ७ रोजी सकाळी रेल्वेने जळगाव येथे आगमन झाले. अजिंठा विश्रामगृहात थोडा वेळ थांबून ते शासकीय वाहनांच्या ताफ्यासह अमळनेरकडे रवाना झाले. अमळनेर तालुक्याच्या हद्दीत पोहचताच ते वाहनातून खाली उतरले आणि डोके टेकवत अमळनेरच्या भूमीला वंदन केले. मात्र, अमळनेर येथे त्यांच्या स्वागतासाठी शाळकरी मुलं रस्त्यावर बसवण्यात आली होती. रस्त्याच्या दुतर्फा शाळेचा गणवेश परिधान करुन ही मुलं मंत्रीमहोदयांच्या गाडीची वाट पाहताना बसल्याचे दिसून येते. या निरागस मुलांना मंत्रीपद काय, मंत्री कोण, आपण का बसलोय, याच अर्थातच ज्ञान असण्याचं कारण नाही. मात्र, ज्यांनी कोणी या मुलांना रस्त्यात बसवून मंत्रीमहोदयांच्या स्वागताचा वेगळाच पायंडा पाडलाय, त्यावरुन आता अनिल पाटील यांच्यावर आणि अजित पवार यांच्यावरही टीका होतेय. 

महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला आहे. ''भाजपच्या सोबतीला जाऊन अजित पवार गटाची बुद्धी सुद्धा भ्रष्ट होतेय वाटतं. तुमच्या घाणेरड्या राजकारण्याची किमान शाळकरी मुलांचा तरी वापर करु नका'', असे ट्विट काँग्रेसने केलं आहे. काँग्रेसच्या या ट्विटवर काहींनी कमेंट करुन आपल मतही मांडलं आहे. 

दरम्यान, अनिल पाटील यांचं कार्यकर्त्यांनी मतदारसंघात जल्लोषात स्वागत केले. यावेळी, पुष्पहारांच्या माळा गळ्यात घालण्यात आल्या. तर, हलगी आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी, कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीचंही आयोजन केलं होतं. 

टॅग्स :अजित पवारकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसमुंबईजळगाव