Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दादा भुसे अन् महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे समजले, घटनेची चौकशी व्हावी'; जयंत पाटलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 14:26 IST

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चौथ्या दिवशीविधानसभेच्या लॉबीत बोलताना शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये वाद झाल्याचे बोलले जात आहे.

मुंबई- आज अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चौथ्या दिवशीविधानसभेच्या लॉबीत बोलताना शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये वाद झाल्याचे बोलले जात आहे. मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणी आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात चौकशीची मागणी केली आहे. 

दादा भुसे अन् महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की?; नेमकं काय घडलं, शंभूराज देसाईंनी सांगितलं!

जयंत पाटील म्हणाले, थोड्यावेळापूर्वी आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादासाहेब भुसे यांच्यात लॉबीत धक्काबुक्की झाल्याची माहिती प्रसार माध्यमातून समजत आहे. अशी काही धक्काबुक्की झाली असेल तर त्याची माहिती घ्यावी, त्याची माहिती सभागृहाला अवगत करावी आणि संबंधीत सदस्यांना समज द्यावी, हे प्रकरण गंभीर आहे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

शिंदे गटाचे आमदार एकमेकांना भिडले

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यात विधानसभेच्या लॉबीत शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात वाद झाला. हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहचला. त्यावेळी मंत्री शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटल्याचं बोलले जाते.

मात्र या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.  पोलिसांनी विधानभवनात येऊ नये अशी प्रथा आहे. सत्ताधारी मंत्री आमदारांमध्ये हमरीतुमरी होणे धक्कादायक आहे. वरिष्ठांनी लहानांना कसं वागवायचे हे योग्य नाही. संस्कृती धुळीस मिळवली आहे. महेंद्र थोरवे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. विधानसभेत असं होऊ नये असं प्रामाणिक मत आहे.  विधानसभेचे नावलौकीक कायम राहू द्या असं राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

तर महाराष्ट्रात भाजपानं जे राजकारण उभं केले, त्यात सभागृहालाच आखाडा केलेला दिसतो. जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी स्वत:च्या स्वार्थासाठी एकमेकांवर लॉबीत भिडले गेलेत. हे खोक्याचे प्रकरण आहे. हा प्रकार लाजिरवाणा आहे अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.

टॅग्स :जयंत पाटीलशिवसेनाभाजपा