Join us

"महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आधीच आमच्या..."; आदित्य ठाकरेंचे महायुतीला तीन सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 20:59 IST

भाजप आणि महायुतीकडून ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केलं जात असताना आता आदित्य ठाकरेंनी याच मुद्द्यावरून महायुतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 

Loudspeaker News: "ह्या सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का आहे?", असा सवाल करत शिवसेनेचे (यूबीटी) आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला घेरले. माईक आणि लाऊडस्पीकर लावण्याच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत भोंगे असले पाहिजेत. त्याचबरोबर सकाळी सहा ते रात्री १० पर्यंत ५५ डेसिबल मर्यादेत सुरू ठेवले पाहिजेत, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्यानंतर प्रशासनाकडून कार्यवाही सुरू झाली आहे. याच मुद्द्यावरून आता आदित्य ठाकरेंनी सरकारला सवाल केला आहे. 

ठाकरे म्हणाले, माईक आणि लाऊडस्पिकरचे नियम दाखवून...

आमदार आदित्य ठाकरे यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आधीच आमच्या गणेश मंडळांना विविध नियमांमध्ये अडकवून आणि विसर्जनाचा प्रश्न प्रलंबित ठेवून छळलं जातंय... आणि आता कोळीबांधवांसाठीच नाही तर सर्व हिंदू धर्मीयांसाठी महत्वाच्या असलेल्या होळी सणाच्या वेळी 'माईक आणि लाऊडस्पिकरचे नियम' दाखवून माझ्या वरळी मतदारसंघातल्या कोळीवाड्यातल्या उत्सवावर विरजण घालण्याचं काम सुरु आहे." 

मराठी माणसाच्या मुद्द्यावरून महायुतीला सवाल 

आदित्य ठाकरेंनी पुढे म्हटलं आहे की, "ह्या सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का आहे? 'चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावर मात्र मराठी सणांवर बंधन घालायची', ही कसली निती?", असे दोन सवाल आदित्य ठाकरेंनी केले आहेत. 

पुन्हा परवानगी मिळणार नाही -मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केले की, "परवानगीशिवाय परस्पर भोंगे लावता येणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास भोंगे जप्त केले जातील आणि पुन्हा परवानगी मिळणार नाही. या सगळ्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाची असेल आणि अंमलबजावणी न झाल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाईल", असेही फडणवीसांनी सांगितले होते. 

टॅग्स :आदित्य ठाकरेदेवेंद्र फडणवीसमहायुतीमहाराष्ट्र सरकार