Join us

राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंचा करेक्ट कार्यक्रम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 10:47 IST

MNS Shiv Sena Thackeray Group Alliance News: संजय राऊत कौटुंबिक कार्यक्रमात व्यग्र असतानाच ठाकरे बंधूंनी त्यांच्या गैरहजेरीत महत्त्वाची चर्चा आटोपून घेतल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे.

MNS Shiv Sena Thackeray Group Alliance News: मुंबई महापालिकेसह राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे बंधूंच्या भेटी वाढल्या असून, रविवारी राज ठाकरे यांनी अचानक ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांत ठाकरे बंधू वेगवेगळ्या निमित्ताने ५ वेळा एकत्र आले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सातत्याने ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य करताना दिसत मिळत आहेत. यापूर्वी महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकार स्थापन होणे यातही संजय राऊतांची भूमिका महत्त्वाची मानली गेली होती. त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यातही राऊत यांची मोर्चेबांधणी महत्त्वाची मानली जात होती. परंतु, संजय राऊतांच्या गैरहजेरीत मातोश्रीवर ठाकरे बंधूंनी महत्त्वाची चर्चा उरकून घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

ठाकरे बंधूंच्या सातत्याने वाढत असलेल्या भेटी तसेच उद्धवसेना आणि मनसे युतीबाबत दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून केले जाणारे भाष्य यामुळे या दोन्ही पक्षांच्या युतीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यापूर्वी गणेशोत्सवात उद्धव ठाकरे दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गेले होते. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा उद्धव ‘शिवतीर्थ’वर गेले आणि तिथे युतीसंदर्भात दोन्ही बंधूंची प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. परंतु, अलीकडेच झालेल्या भेटीत दोन्ही ठाकरे बंधूंनी करेक्ट कार्यक्रम केला आणि संजय राऊतांच्या गैरहजेरीत महत्त्वाची बोलणी केल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात असल्याचे बोलले जात आहे.

राऊतांच्या गैरहजेरीत बैठक आटोपली!

हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे २० वर्षांनंतर पहिल्यांदाच एका राजकीय व्यासपीठावर एकत्र दिसले. त्यानंतर तीन वेळा काही कौटुंबिक आणि सणानिमित्त भेटी झाल्या. उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी रविवारी बारसे झाले. कार्यक्रमाला दोन्ही ठाकरेंनी राऊतांच्या घरी हजेरी लावली. तिथून निघल्यानंतर ते थेट ‘मातोश्री’वरच पोहोचले. कालपर्यंत त्यांच्या चार भेटी झाल्या. त्यावेळी राऊत उपस्थित होते आणि राजकीय चर्चा झाली नाही, असे त्यांनीच सांगितले. राऊत रविवारी त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात व्यग्र असतानाच दोन्ही ठाकरेंनी त्यांच्या गैरहजेरीत महत्त्वाची चर्चा आटोपून घेतली. त्यामुळे याची चर्चा झाली नाही तर नवल!

दरम्यान, संजय राऊत यांच्या घरी बारशानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. दोन्ही बंधू राऊतांसह इतर सहकाऱ्यांसोबत गप्पा मारताना दिसले. तसेच निघताना दोघेही एकत्रितपणे बाहेर पडले. त्यावेळी स्वतः रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना निरोप दिला. भेटीनंतर राज ठाकरे आपल्या घरी न जाता थेट ‘मातोश्री’वर गेले. ‘मातोश्री’वर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील मिळाला नसला तरी मुंबई महापालिकेसह राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray Brothers Meet Amid Alliance Buzz, Raut Absent: What's Cooking?

Web Summary : Speculation swirls as Thackeray brothers intensify meetings, fueling Shiv Sena-MNS alliance talks. Key discussions reportedly occurred at 'Matoshree' without Sanjay Raut, hinting at strategic political moves before upcoming local elections.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२५शिवसेनामनसेराज ठाकरेउद्धव ठाकरेसंजय राऊत