Join us

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 06:22 IST

२०१७ मध्ये महापालिकेच्या ८४ जागा जिंकल्या होत्या. त्यातील अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात गेले असले तरी त्या जागांवर दावा करत उद्धवसेना अधिक जागा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे

मुंबई - पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना व मनसे युतीची अधिकृत घोषणा दिवाळीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईत समसमान तर उपनगरासाठी ६०:४० या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहे. ठाणे, कल्याण या पालिकांसाठी स्वतंत्र फॉर्म्युला असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आपापल्या पक्षाच्या नेत्यांना मुंबईतील जागांची यादी करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत २२७ वॉर्डांपैकी उद्धवसेनेने १४७ जागांवर दावा केला आहे. मनसेला ८० जागा देण्याची तयारी केली आहे. मात्र, मनसेने ९५ जागांचा आग्रह धरला आहे. 

एकमेकांच्या ताकदीच्या आधारे निर्णयमुंबईत उद्धवसेनेचे ३ खासदार व १० आमदार आहेत. तर, २०१७ मध्ये महापालिकेच्या ८४ जागा जिंकल्या होत्या. त्यातील अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात गेले असले तरी त्या जागांवर दावा करत उद्धवसेना अधिक जागा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे, काही प्रभागांमध्ये मनसेचा प्रभाव असून त्या जागांबाबत चर्चा सुरू आहे. दादर- माहीम, परळ, विक्रोळी, दिंडोशी, घाटकोपर, भांडुप, दहिसर अशा विधानसभा मतदारसंघात समान प्रमाणात वॉर्ड विभागले जातील. तर, उर्वरित ठिकाणी एकमेकांच्या ताकदीच्या आधारे निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेमनसे