Join us
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 20:25 IST

जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला १२७ ते १५४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे तर ठाकरे बंधू युतीला ४४ ते ६४ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

मुंबई - महापालिकेच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत २५ वर्षांची ठाकरेंची सत्ता उलथवण्यात भाजपाला यश येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेला १०० हून अधिक जागांचा अंदाज वर्तवला आहे. तर पहिल्यांदाच एकत्र येऊन निवडणूक लढवणाऱ्या ठाकरे बंधू यांना मुंबईत फारसं यश मिळाले नाही असं चित्र एक्झिट पोलच्या आकडेवारीतून दिसते. मात्र या सर्व अंदाजानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरतेय हेच दिसून येत आहे. 

मुंबईत काय आहे कौल?

एक्सिस माय इंडिया पोलनुसार भाजपा महायुतीला १३८ जागा मिळण्याचा अंदाज आहे तर ठाकरे बंधूंना ५८ ते ६५ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे. त्याशिवाय काँग्रेस आणि वंचित आघाडीला १२ ते १६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला १२७ ते १५४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे तर ठाकरे बंधू युतीला ४४ ते ६४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याशिवाय काँग्रेस वंचित आघाडीला १६ ते २५ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मनसेला कितपत यश?

PRAB संस्थेच्या पोलनुसार मनसेला पुण्यात एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज आहे. याठिकाणी भाजपाला ९३, शिंदेसेनेला ६, उद्धवसेनेला ७ आणि दोन्ही राष्ट्रवादीला मिळून ५१ जागांचा अंदाज वर्तवला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला ६४, शिंदेसेना ९, दोन्ही राष्ट्रवादीला ५२, काँग्रेसला १ आणि  मनसेला १ जागा मिळेल अशी शक्यता वर्तवली आहे. JDS या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत मनसेला ० ते ६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे तर उद्धवसेनेला ४४-५८, भाजपा ८७ ते १०१, शिंदेसेना ४०-५४ जागा आणि काँग्रेसला १६ ते २५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. JVC संस्थेनुसार भाजपा ९७ ते १०८, शिंदेसेना ३२ ते ३८, उद्धवसेना ५२ ते ५९, मनसेला २ ते ५ जागा आणि काँग्रेसला २१ ते २५ जागांचा अंदाज वर्तवला आहे.

मनसेने आजपर्यंत सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या होत्या. या निवडणुकीत प्रमुख पक्षांविरुद्ध लढताना मनसेला मुंबईत २०१२ साली २८, २०१७ साली ७ जागा मिळाल्या होत्या. त्याशिवाय पुण्यात २०१२ साली २९ आणि २०१७ साली अवघ्या २ जागा मिळाल्या होत्या. मात्र आता उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यानंतरही मनसेच्या पारड्यात फारसं यश मिळण्याचं चिन्हे नाहीत असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंबाबत भविष्यवाणी केली होती. उद्धव ठाकरेंसोबत युतीत राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव होईल. ही माझी भविष्यवाणी आहे असं भाकीत फडणवीसांनी वर्तवले होते. त्यामुळे एक्झिट पोलनुसार फडणवीसांची भविष्यवाणी खरी ठरतेय असं दिसते. मात्र प्रत्यक्ष निकालात मनसे काय कामगिरी करते हे काही तासांनी स्पष्ट होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Exit Polls Predict Raj Thackeray's Biggest Loss; Fadnavis's Prediction True?

Web Summary : Exit polls suggest BJP may end the Thackerays' 25-year Mumbai reign. Raj Thackeray's alliance with Uddhav may result in significant losses, fulfilling Fadnavis's prediction. Actual results are awaited.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६देवेंद्र फडणवीसराज ठाकरेमनसेभाजपाउद्धव ठाकरे