पोलिसांकडून अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर! न्यायालयीन समितीचा धक्कादायक अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:09 IST2025-01-20T13:07:11+5:302025-01-20T15:09:39+5:30
बदलापूर प्रकरणातील आरोप अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून फेक एन्काऊंटर करण्यात आल्याचे चौकशी अहवालातून समोर आलं आहे.

पोलिसांकडून अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर! न्यायालयीन समितीचा धक्कादायक अहवाल
Badlapur Encounter:बदलापूर येथील शाळेतील निष्पाप मुलींचे शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याच्या चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयात धक्कादायक अहवाल सादर करण्यात आला आहे. बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंच्या कथित बनावट चकमकीचा चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. आरोपी अक्षय शिंदेला घेऊन जाणाऱ्या पाच पोलिसांकडून वापरलेले बळ अनावश्यक होते आणि त्याच्या मृत्यूसाठी हे पाच पोलिस जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आता न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालावरुन आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बदलापुरातील एका शाळेतील तीन चिमुकलींच्या अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला होता. आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिस पथकावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली होती. आरोपीने पोलिस पथकावर गोळीबार केला, ज्यात पोलिस अधिकारीही जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला. पोलिसांचे पथक तळोजा कारागृहातून अक्षयला घेऊन जात असताना हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र आता न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
"अक्षय शिंदेसोबत झालेल्या झटापटीत पाच पोलिसांनी वापरलेला बळाचा वापर अनावश्यक होता आणि त्याच्या मृत्यूसाठी हे पाचही पोलीस जबाबदार आहेत. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, अक्षय शिंदेंने त्यांच्यावर गोळीबार केला होता. मात्र मृताचे बंदुकीवर बोटांचे ठसे नाहीत. स्वसंरक्षणार्थ गोळीबार करणाऱ्या पोलिसांचा वैयक्तिक बचाव अवास्तव आणि संशयास्पद आहे," असे अहवालात म्हटलं आहे.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने खुल्या न्यायालयात अहवाल वाचून दाखवला. "गोळा केलेल्या साहित्यानुसार आणि एफएसएल अहवालानुसार, मृताच्या पालकांचे आरोप योग्य आहेत आणि हे पाच पोलीस त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असे म्हटले जाते," असे न्यायमूर्ती मोहिते-डेरे यांनी अहवाल वाचून दाखवताना म्हटलं.
यानंतर अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांच्या सहाय्याने महाराष्ट्राचे मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी राज्य कायद्यानुसार कारवाई करेल आणि या पोलिसांवर एफआयआर दाखल करेल, अशी माहिती खंडपीठाला दिली.