मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 06:54 IST2026-01-13T05:53:09+5:302026-01-13T06:54:16+5:30
अदानीच नाही तर मोदींच्या काळात अनेकांचे नेटवर्थ वाढले

मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबई : मराठी मुलांना रोजगार देण्यासाठी उद्योगपतींचे, मोठ्या प्रमाणातील गुंतवणुकीचे महाराष्ट्रात स्वागत केले तर त्यात गैर काय असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'तुमचे बरे आहे फक्त भाषणे द्यायची आणि मराठी माणसाला फक्त शिववडापावची गाडी द्यायची. आम्हाला मराठी मुलांच्या डोळ्यांतील स्वप्ने पूर्ण करायची आहेत. त्यांना रोजगारासोबत उद्योगपतीही बनवायचे आहे, असा हल्लाबोल शिवाजी पार्कवरील भाजप-शिंदेसेनेच्या प्रचारसभेत केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत फडणवीस यांनी उद्योगपती अदानींवरून राज व उद्धव ठाकरे यांनी रविवारी याच ठिकाणी झालेल्या सभेत केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच हिंदी सक्तीचा निर्णय कसा समिती नेमून घेतला होता त्याची कागदपत्रे फडणवीसांनी तारीखवार दाखवून दिली.
'ती' राज्ये वेडी आहेत का?
उद्योगपती, गुंतवणूकदारांचे महाराष्ट्र स्वागतच करेल. उद्योगपती अदानी हे यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांची सरकारने असलेल्या राज्यांमध्येही कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे, हे सांगताना फडणवीस यांनी त्याची आकडेवारी दिली. त्यात कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणापासून केरळ, पश्चिम बंगालचाही समावेश आहे, असे सांगून त्यांनी तेथील मुख्यमंत्र्यांसोबतचे अदानींचे फोटो सभेत दाखविले. ही सगळी राज्ये वेडी आहेत का? जर उद्योजकांना गुंतवणकीला नाकारले तर गुंतवणूक दुसरीकडे जाईल. मग आमच्या मुलांना काम कसे मिळेल, असा सवालही त्यांनी ठाकरेंना केला.
नक्कल करून काकांच्या पक्षाची काय अवस्था झाली?
आदित्यशी चर्चा करण्याचे मला आव्हान देण्यात आले. पण आमच्या शीतल गंभीर आदित्यसोबत चर्चा करण्यासाठी पुरेशा आहेत. माझे खुले आव्हान आहे आदित्यने कुठे यायचे ते सांगा आमच्या शीतल गंभीर येतील. आदित्य ठाकरेंनी सभेत फडणवीसांची नक्कल केली होती. त्यावर नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय अवस्था झाली ते पहा. काकाला चांगले भाषण तरी करता येते. तुमचे काय होईल असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.
ठाकरे बंधुंच्या एकमेकांवरील टीकेचा, 'लावा रे तो व्हिडीओ'
एरवी लावा रे तो व्हिडिओ ही राज ठाकरे यांची स्टाइल, मुख्यमंत्र्यांनी त्याच स्टाइलमध्ये व्हिडीओ लावायला सांगितले ते ठाकरे बंधुंनी एकमेकांवर केलेल्या मनसोक्त टीकेचे. उद्धव म्हणताहेत, राजने बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला. राज उद्धव यांच्याबद्दल म्हणताहेत, हा माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं, देशाला माहिती नाही, एवढं माहिती आहे मला याच्याबद्दल. बाळासाहेबांच्या नावाखाली त्याने महापौर बंगला ढापला. उद्धव म्हणताहेत, काही जणांना उगाच बाळासाहेब झाल्यासारखे वाटते. आदित्य ठाकरे मनसेबद्दल म्हणताहेत, 'मी संपलेल्या पक्षांबद्दल बोलत नसतो'. उद्धव हे राज यांना सुपारीबाज म्हणताहेत, असे बरेच व्हिडिओ दाखवून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मला आणखी काही सांगण्याची गरज आहे का?
'तुमको मिर्ची लगी तो मै क्या करू'
मी राजकारणात जन्मालाही आलो नव्हतो तेव्हा या नवी मुंबईच्या विमानतळाची संकल्पना १९८८ सालापासून आहे. तुम्ही मातोश्री १ वरून मातोश्री २ वर गेले कारण जागा कमी पडत होती. राज ठाकरे यांनी पण घर बदलले. मुंबई विमानतळावर एकच धावपट्टी होती. पंचवीस वर्षांपासून चालले होते नवीन विमानतळ बनवायचे आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात पाच वर्षात नवीन विमानतळ करून दाखविले. तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करू' असा टोला फडणवीस यांनी लगावला, मी आज सांगतो की लंडनप्रमाणे मुंबईतही तिसरा एअरपोर्टही करणार. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाची क्षमता दीड पट करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असेही ते म्हणाले.