"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:19 IST2025-12-06T16:08:42+5:302025-12-06T16:19:08+5:30
IndiGo flights Choas, Mumbai Airport tourist Angry: "तीन दिवस माझी पोरं-बाळं अडकून पडलेली, आता बॅगांशिवाय पाठवून दिलंय..."; प्रवाशाचा संताप

"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
IndiGo flights Choas, Mumbai Airport tourist Angry: इंडिगोविमानसेवेचा सावळा गोंधळ अद्यापही सुरुच आहे. इंडिगोच्या गचाळ व्यवस्थापनाने गेल्या पाच दिवसांपासून प्रवाशांना प्रचंड त्रस्त करून सोडले आहे. विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी, निराशा आणि संतापाचे चित्र आहे. विमानतळावर काहींना भावना अनावर झाल्याचे दिसून आले. तर काहींना संताप अनावर झाल्याचे दिसले. मुंबईत विदेशी महिलेचा राग इतका वाढला की तिने थेट विमान कंपनीच्या काउंटरवर चढून थयथयाट केला. त्यातच आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एका प्रवाशाची बॅगच मुंबईला आली नसल्याने तो तुफान राडा घालताना दिसतोय.
नेमका काय घडला प्रकार?
इंडिगो विमानसेवेच्या गोंधळामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. एका प्रवाशाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यात तो प्रवाशी इंडिगोच्या काउंटरवर हात आपटताना दिसतोय. तो असेही सांगताना दिसतोय की, आम्ही गेल्या तीन दिवसांपासून बंगळुरूत अडकून पडलो होतो. जेवणाची, पाण्याची कसलीच सोय करण्यात आली नव्हती. अखेर आज आम्ही मुंबईत आलोय. पण आमच्या बॅगा आलेल्याच नाहीत. आमच्या घराची चावी त्या बॅगेत आहे. आमचे पासपोर्ट त्या बॅगेत आहेत. आता आम्ही काय करायचं? असे जोरजोरात ओरडून हात काउंटरवर आपटताना आणि जाब विचारताना तो दिसत आहे.
#WATCH | Maharashtra | IndiGo passengers at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport in Mumbai, lose their cool and get into a heated argument with the airline staff at the ticket counter, amid the nationwide IndiGo flight cancellations. pic.twitter.com/lMWqs0joNQ
— ANI (@ANI) December 6, 2025
सरकारचा महत्त्वाचा निर्णय
इंडिगोच्या सध्याच्या संकटानंतर इतर विमान कंपन्यांनी विक्रमी भाडेवाढ जाहीर केली आहे. ज्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. विमान भाड्यात अचानक झालेल्या वाढीबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाने आता कडक भूमिका घेतली आहे आणि सरकारने काही विमान कंपन्यांना वाढीव भाड्यांबाबत गंभीर सूचना दिल्या आहेत. याव्यतिरिक्त, प्रवाशांना जास्त भाडे देण्यापासून रोखण्यासाठी मंत्रालयाने भाडे मर्यादा लागू केल्या आहेत. सर्व विमान कंपन्यांना नवीन भाडे मर्यादांचे पालन करणे बंधनकारक आहे, जे परिस्थिती सामान्य होईपर्यंत लागू राहतील.
विमान भाड्यांचे 'रिअल-टाइम ट्रॅकिंग' होणार
या संकटकाळात, मंत्रालयाने विमान भाड्याचे रिअल-टाइम ट्रॅकिंग करण्याचा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विमान कंपन्यांवर तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे आकाशाला भिडणाऱ्या विमान तिकिटांच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.
भाड्यात किती फरक पडला?
इंडिगोची विमान उड्डाणे रद्द झाल्यानंतर इतर विमान कंपन्यांचे भाडे गगनाला भिडले आहे. दिल्ली ते मुंबईचे भाडे सामान्यतः ६,००० रुपये असते, ते आता सुमारे ७०,००० रुपये आहे. दिल्ली ते पाटणा हे भाडे जे सामान्यतः ५,००० रुपये असते, ते आता ६०,००० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. दिल्ली ते बेंगळुरू हे भाडे सामान्यतः ७,००० रुपये असते, ते आता १ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. शिवाय, दिल्ली ते चेन्नईचे भाडे ९०,००० रुपये झाले आहे, तर दिल्ली ते कोलकाता भाडे सुमारे ६८,००० रुपये आहे.