Indian cinema is renowned in world due to talented directors - Supriya Sule | प्रतिभासंपन्न भारतीय दिग्दर्शकांमुळे सिनेसृष्टीचा जगात लौकिक - सुप्रिया सुळे

प्रतिभासंपन्न भारतीय दिग्दर्शकांमुळे सिनेसृष्टीचा जगात लौकिक - सुप्रिया सुळे

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास गौरवशाली आहे. त्याचबरोबर, मराठी चित्रपटांचीही मोठी परंपरा असून, त्यात प्रामुख्याने सामना, सिंहासन, जैत रे जैत, उंबरठा असे सिनेमे जब्बार पटेल यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न भारतीय दिग्दर्शकांनी सिनेसृष्टीला देऊन हे क्षेत्र समृद्ध केले, तसेच जगात लौकिक वाढविला आहे, असे विचार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १० व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

या महोत्सवात सिनेसृष्टीतील विशेष योगदानाबद्दल गौरविण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर या खऱ्या अर्थाने आजही ‘सपनों की रानी’ असून, त्या ज्या राज्यातून आहेत, त्या पश्चिम बंगालने वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक मान्यवर दिले असून, देशाच्या विकासात मोलाचे योगदान आहे, असेही विचार त्यांनी व्यक्त केले.

भारतीय सिनेमा क्षेत्रात वावरताना चांगले दिग्दर्शक मिळाले, त्यामुळे अभिनय शिकता आला, तसेच या क्षेत्राने खूप मानसन्मान मिळवून दिला. त्यामुळे आपण खूप समाधानी आणि आनंदी आहोत, असे उद्गार शर्मिला टागोर यांनी काढले.  हा मानाचा पुरस्कार दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. चित्रपट महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल यांनी या महोत्सवामागील भूमिका स्पष्ट केली.

भारत, चीन, रशिया, फ्रान्स, इराण, बेल्जियम, अर्जेंटिना, इस्त्रायल, तुर्की आदी देशांतील चित्रपट एकाच ठिकाणी पाहण्याची सुवर्णसंधी सर्वांसाठी यशवंत चित्रपट महोत्सवाने उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी दिली.
 

Web Title: Indian cinema is renowned in world due to talented directors - Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.