Join us

गोव्यानंतर आता मुंबईत पाऊस, समुद्रात उंच लाटा उसळणार; हवामान खात्याचा इशारा, कुठलं संकट येतंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:32 IST

महाराष्ट्राच्या रायगड किनारपट्टीवर ३० ऑक्टोबरच्या रात्री ११.३० वाजेपर्यंत २.७ ते ३.० मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

मुंबई - गोव्यातील अनेक भागात पाऊस पडल्यानंतर अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता गुजरातच्या दिशेने पुढे जात आहे. त्याचा परिणाम मराठवाडा आणि मुंबई परिसरात दिसून येत आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात ढगाळ वातावरण राहणार असून सौम्य ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय वेगवान वारेही वाहतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागानुसार, मुंबईत कमाल ३४ अंश सेल्सियस आणि किमान २६ अंश सेल्सियम तापमान राहण्याचा अंदाज आहे. आता हा कमी दाबाचा पट्टा गुजरातच्या दिशेने जात आहे. उत्तर कोकणातील बहुतांश जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणात, उत्तर मध्य महाराष्ट्र याठिकाणीही काही जिल्ह्यात पाऊस पडू शकतो. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.   

पूर्व-मध्य अरबी समुद्रावर निर्माण झालेला हा कमी दाबाचा पट्टा गेल्या ६ तासांत ताशी १३ किलोमीटर वेगाने पश्चिमेकडे सरकत आहे असं भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले. त्याचे केंद्र अक्षांश १७.९°उत्तर आणि रेखांश ६८.२°पूर्व आहे, जे वेरावळ (गुजरात) पासून सुमारे ४०० किलोमीटर नैऋत्येस, मुंबई (महाराष्ट्र) पासून ५१० किलोमीटर पश्चिम-नैऋत्येस आणि पणजी (गोवा) पासून ६६० किलोमीटर पश्चिम-वायव्येस आहे. पुढील ३६ तासांत ही प्रणाली पूर्वमध्य अरबी समुद्र ओलांडून पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे.

समुद्रात उसळणार उंच लाटा

महाराष्ट्राच्या रायगड किनारपट्टीवर ३० ऑक्टोबरच्या रात्री ११.३० वाजेपर्यंत २.७ ते ३.० मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे ठाणे, मुंबई आणि आसपासच्या किनारपट्टी भागात २.६ ते ३.१ मीटर उंच लाटा उसळतील. हवामान खात्याने समुद्रातील या हालचालीमुळे किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा दिला आहे. ३० ते ३१ ऑक्टोबरला कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवाच्या किनारी भागात आणि आसपासच्या सागरी क्षेत्रात ३५ ते ४५ किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकते. पूर्व मध्य अरबी समुद्रात काही भागात ४५ ते ५५ किमी प्रति तास वेगाने वारे वाहील. त्यामुळे मच्छिमारांना या भागात न जाण्याचा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Rainfall Alert: High Waves Expected; Weather Department Warns of Impending Danger

Web Summary : Following Goa's rainfall, Mumbai anticipates rain and high waves due to a low-pressure area near Gujarat. Moderate rainfall, strong winds, and waves up to 3.1 meters are expected along the coast. Fishermen are advised to avoid the sea.
टॅग्स :हवामान अंदाजपाऊस