मुंबई उपनगरातील उपकरप्राप्त इमारतींसाठी स्वतंत्र दुरुस्ती मंडळ; आव्हाड यांचे विधानसभेत आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 07:00 IST2020-09-09T01:12:57+5:302020-09-09T07:00:36+5:30
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेसाठी प्रयत्न करणार

मुंबई उपनगरातील उपकरप्राप्त इमारतींसाठी स्वतंत्र दुरुस्ती मंडळ; आव्हाड यांचे विधानसभेत आश्वासन
मुंबई : मुंबई उपनगरातल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी इमारत दुरुस्ती मंडळ स्थापन करण्यात येईल अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. तत्पूर्वी सर्वपक्षीय सदस्यांनी त्यासाठी आग्रह धरला.
मुंबईतील म्हाडाच्या शहर विभागात असणाऱ्या उपकर प्राप्त इमारती आहेत त्या पुनर्विकासाला गेल्यानंतर तीन वर्षात कामाला सुरुवात झाली नाही. पुनर्विकासाचा प्रस्ताव रखडला तर त्या म्हाडा ताब्यात घेऊन पुनर्विकास करेल, अशी सुधारणा कायद्यात करण्यात आली. शहरांचा प्रश्न सोडवताय पण उपनगरांचे काय असा सवाल सदस्यांनी विधेयकावरील चर्चेत केला.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास सुधारणा विधेयकावरील चर्चेत आशिष शेलार, अमिन पटेल, सदा सरवणकर, अतुल भातखळकर, पराग अळवणी तसेच सुनील प्रभू यांनी भाग घेतला. वांद्रे पश्चिम येथील म्हाडा संक्रमण शिबीराचा पुनर्विकासाचे काम रखडले आहे, असे शेलार म्हणाले. मुंबईच्या उपनगरातील इमारतीच्या पुनर्विकासाचा विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.
म्हाडा इमारती शेजारी असणाºया जागेचा अधिकाऱ्यांनी मोकळी जागा(ओपन स्पेस)असा अर्थ लावल्याने या इमारतींच्या रखडलेल्या कन्वेन्स डिड याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. मंत्री आव्हाड म्हणाले की, मुंबई शहरातील संक्रमण शिबिरांसाठी जागा शिल्लक राहिली नाही. मुंबई पोर्ट ट्रस्टची २५ एकर जागा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करू. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले तर त्यासाठी आम्ही दिल्लीलाही येऊ असे आव्हाड म्हणाले.
‘विषय मार्गी लावणार’
वांद्रे पश्चिम येथील म्हाडा संक्रमण शिबीराचा पुनर्विकासाचे रखडलेले विषय एका महिन्यात मार्गी लावले जातील. ओपन स्पेस म्हणजे किती व कोणती जागा या बाबत लवकरच स्पष्टता आणणारा आदेश काढला जाईल.
- जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री