स्वातंत्र्य, अपेक्षा, करिअरशी कमिटमेंट घेतात संसाराचा बळी

By दीप्ती देशमुख | Published: March 12, 2023 08:37 AM2023-03-12T08:37:22+5:302023-03-12T08:38:01+5:30

मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महानगरांमध्ये काडीमोड होण्याचे प्रमाण अधिक

independence expectations commitment to career are victims of the world and increased in divorce cases | स्वातंत्र्य, अपेक्षा, करिअरशी कमिटमेंट घेतात संसाराचा बळी

स्वातंत्र्य, अपेक्षा, करिअरशी कमिटमेंट घेतात संसाराचा बळी

googlenewsNext

दीप्ती देशमुख, वरिष्ठ प्रतिनिधी  

हॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींचे घटस्फोट नवे नाहीत. बॉलिवूडमध्येही लोकप्रिय जोड्या घटस्फोट घेतात तेव्हा चर्चा हाेतेच. छाेट्यामोठ्या कुरबुरी कोणाच्या संसारात नसतात? मात्र आता शहरी मध्यमवर्गीय कुटुंबातही सतत काडीमोड हाेत आहेत. विशेषतः दोघेही नोकरी करणारे असतील तर घटस्फाेट घेण्याचे  प्रमाण वाढले आहे. काय आहेत त्याची कारणे? महिलांच्या पतीकडून नेमक्या काय अपेक्षा असतात?

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कुटुंब न्यायालयात ५००० प्रकरणे प्रलंबित असल्याचे मान्य करत मुंबईत नवीन १७ कुटुंब न्यायालये, तर राज्यात एकूणच ४१ नवीन कुटुंब न्यायालयाने स्थापन करण्याचे जाहीर केले. मुंबईसह राज्यभरातील कुटुंब न्यायालयांत सध्या ५९ हजार ४४८ प्रकरणे प्रलंबित आहेत. या आकडेवारीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. घटस्फोट याचिकांची वाढती संख्या हे नक्कीच सदृढ समाजाचे लक्षण नाही. सध्या कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली तरी कुटुंब न्यायालयांतील वकील व समुपदेशकांच्या म्हणण्यानुसार, न्यायालय ८५ टक्के प्रकरणांत घटस्फोट मंजूर करते. तज्ज्ञांच्या मते, दररोज किमान २४ घटस्फोट याचिका दाखल होतात. 

आजही आपल्याकडे महिलांनी पुढाकार घेऊन घटस्फोट मागण्याची प्रकरणे कमी आहेत. बहुतांश प्रकरणांत पुरुषच घटस्फोट मागताना दिसतात. पण बदलत्या सामाजिक स्थितीमुळे महिलाही पुढाकार घेऊन घटस्फोट मागतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सुदृढ सहजीवनासाठी...

- एकमेकांकडून वाढलेल्या अपेक्षा, एकमेकांसाठी वेळ नसणे, कमी संवाद इत्यादी कारणे घटस्फोटासाठी समोर येत आहेत.
- महिला अधिक स्वतंत्र झाल्या आहेत आणि एकत्रित कुटुंबपद्धती लुप्त पावत आहे. 
- आजची पिढी कुटुंबाभिमुख होण्यापेक्षा करिअर- केंद्रित झाली आहे. मोठा पगार घेऊन मोठ्या हुद्द्यावर काम करणारी काही दाम्पत्ये काही महिने आपल्या साथीदाराशी संवाद न साधताच राहिल्याची उदाहरणेही आहेत. 
- रेफ्रीजरेटवरील चिठ्यांद्वारे किंवा व्हॉट्सॲपद्वारे जो काही संवाद होतो तेवढाच. यावर उपाय म्हणून दाम्पत्याने किमान रात्रीचे जेवण तरी एकत्र बसून करावे. दिवसातला एक तास एकमेकांसाठी द्यायला हवा.

महिलांना काडीमोड का हवा असतो?

- बदलत्या स्थितीत स्त्रियांच्या पुरुषांकडून वाढलेल्या अपेक्षा... पुरेसा सहवास... तसेच पुरुषाने घरकामात मदत करणे, अधिक स्वातंत्र्य देणे व समजूतदारपणा दाखविणे. 
- स्त्री घराबाहेर पडल्याने ‘पती परमेश्वर’ या समजुतीतून बाहेर पडली आहे. परंतु, बहुतांश पुरुष अद्याप जुन्या मानसिकतेच अडकलेले आहेत. 
- महिलांनी करिअर सांभाळून घरकामही करावे. त्यांनी त्यांची पारंपरिक कर्तव्ये विनातक्रार पार पाडावीत, अशी अपेक्षा २१व्या शतकातही पुरुष मंडळी महिलांकडून करत आहेत.
- पूर्वीप्रमाणे मुली २०-२२व्या वर्षात विवाहबंधनात न अडकता करिअर सुरू करून पंचविशीनंतरच विवाह करतात. लवकर विवाह केला तर मन वळवता येते. मात्र, पंचविशीनंतर मुलींचे स्वतःचे विश्व निर्माण झालेले असते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आकार घेतलेला असतो आणि अपेक्षाही वाढलेल्या असतात. 
- आपला साथीदार त्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, असे दिसायला लागते तेव्हा त्या थेट विवाहबंधन संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतात.

नोकरी करणाऱ्या मुलींच्या पतीकडून काय अपेक्षा असतात?

अलीकडे कामाचे स्वरूप आणि वाढलेला ताण लक्षात घेत दाम्पत्य एकमेकांना अधिक स्पेस देतात. मात्र, कधी कधी एक साथीदार या स्वातंत्र्याचा गैरफायदाही घेतो.

अधिकाधिक वेळ मित्र-मैत्रिणींबरोबर घालविला जातो किंवा ते त्यांच्या डिजिटल जगात गुंतलेले असतात.

व्यावसायिक बांधिलकीमुळे त्यांना जास्त वेळ घराबाहेर घालवायला भाग पाडले जाते आणि या प्रक्रियेत गुंतल्याने त्यांना जोडीदाराची आठवणही येत नाही.

जोडीदाराशिवाय जगण्याची सवय लागते आणि जोडीदारापैकी एखादा सदस्य व्यावसायिक वर्तुळात खूप व्यस्त झाल्याने दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होते.

२०२३ मध्ये ९ मार्चपर्यंत राज्यातील कुटुंब न्यायालयात घटस्फोट, मुलांचा ताबा, देखरेखीचा खर्च व अन्य कारणांसाठी 
५,८७४ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. त्यात गेल्याच महिन्यात २,१९९ प्रकरणे न्यायालयात दाखल झाली आहेत. घटस्फोटाचे प्रमाण किती वाढत आहे, हे दाखविण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे.

२०२२या संपूर्ण वर्षात ३३,८०२ प्रकरणे दाखल करण्यात आली. २०२१ मध्ये ३३,६७५ आणि २०२० मध्ये कोविडकाळात १७,७०६ प्रकरणे दाखल झाली होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: independence expectations commitment to career are victims of the world and increased in divorce cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.