वाढीव मते आमचीच! युती, महाआघाडीचे दावे-प्रतिदावे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 04:01 AM2019-05-02T04:01:27+5:302019-05-02T04:01:50+5:30

भाषिक, धार्मिक विविधतेमुळे मिनी इंडिया मानला जाणारा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ २००४ साली राजकीय दृष्टया देशपातळीवर चर्चेत आला

Increasingly our opinion! Alliance, Greater Accomplishment Claims-counter | वाढीव मते आमचीच! युती, महाआघाडीचे दावे-प्रतिदावे

वाढीव मते आमचीच! युती, महाआघाडीचे दावे-प्रतिदावे

Next

गौरीशंकर घाळे

भाषिक, धार्मिक विविधतेमुळे मिनी इंडिया मानला जाणारा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ २००४ साली राजकीय दृष्टया देशपातळीवर चर्चेत आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री, तत्कालीन लोकसभेचे सभापती मनोहर जोशींसारख्या दिग्गज नेत्याचा कॉँग्रेस उमेदवाराने पराभव केला. ‘लो प्रोफाईल’ राहणारे एकनाथ गायकवाड तेंव्हा ‘जाएंट किलर’ ठरले. हा मतदारसंघ एका उमेदवाराला सलग दुसऱ्यांदा विजयी करत नाही, अशी वंदता. गायकवाडांनी आपल्या विजयाने २००९ साली ही वंदताही खोटी ठरवली. २०१४ च्या मोदी लाटेत शिवसेनेने हा आपला मतदारसंघ परत मिळवला. गायकवाड यांचा पराभव करत शिवसेनेचे राहुल शेवाळे खासदार बनले. २०१९ साली पुन्हा एकदा शेवाळे आणिं गायकवाड आमनेसामने आहेत.

साधारण दोन दशकांपासून दक्षिण मुंबईतील मतदानाचा टक्का घसरणीलाच असल्याचे आकडेवारी सांगते. २०१४ साली मोदी लाटेने त्याला छेद दिला. सर्वच मतदारसंघात साधारण दहा ते बारा टक्क्यांनी मतदान वाढले. २०१४ च्या तुलनेत २.१४ टक्कयांनी मतदान वाढले. वाढीव मतदान विद्यमान उमेदवारांना तारणार की गायकवाडांना संधी देणार याबाबत चर्चा रंगली आहे. दोन्ही उमेदवारांकडून वाढीव मतदानावर दावा केला जात आहे.

राजकीय भाषेत बोलायचे झाले तर माहिम विधानसभा मतदारसंघातील उत्साह शिवसेनेच्या पथ्यावर पडणारा असतो. तर, धारावीतील वाढीव मतदान काँग्रेसला बळ देणारे असते. यंदाची विधानसभानिहाय आकडेवारी पाहिल्यास धारावीत सर्वात कमी मतदान झाले आहे. तर, माहिमसह उर्वरीत पाचही मतदारसंघात मते वाढली आहे. अणुशक्ती नगर, सायन कोळीवाडा आणि वडाळा या तीनही विधानसभा क्षेत्रातील मताचा टक्का वाढलेला दिसतो. परंतु, यंदाची आकडेवारी आजवरच्या राजकीय आडाख्यांना पूरकच असेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. माहिमचा पट्टयातून २०१४ साली शिवसेनेला तब्बल ५० हजारांचे मताधिक्य मिळाले होते.

वडाळ्यात सर्वाधिक ५९.६३ टक्के मतदान झाले. येथील दलित आणि मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला एकगठ्ठा मतदान केल्याची चर्चा आहे. तर, काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी युतीला पाठिंबा दिल्याने ही वाढ आमच्यासाठी फायद्याची ठरणार असल्याचा दावा युतीकडून केला जात आहे. धारावीत कमी मतदान झाले असले तरी तिथेही काँग्रेसच्या बाजून एकगठ्ठा मतदान झाले, आमदार वर्षा गायकवाड यांनी धारावीवर लक्ष्य केंद्रीत केले होते, असा दावा काँग्रेस करीत आहे. दलित, मुस्लिम मते पंजाकडे वळली असली तरी येथे मोठ्या प्रमाणात असलेला चर्मकार समाज शिवसेनेसोबतच राहिल्याची चर्चा आहे. अशीच स्थिती चेंबूरबाबत असल्याचे समजते.
बहुभाषिक सायन कोळीवाड्यात भाजपचे विद्यमान आमदार तमिळ सेल्वन युतीसाठी प्रचारात उतरले होते. मात्र, सेल्वन यांच्याबाबत नाराजीचे चित्र आहे. तर अणुशक्ती नगरमधील स्थानिकांची नाराजी दूर करत ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी राहुल शेवाळे यांना मेहनत घ्यावी लागली.

गेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानापेक्षा यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा वाढलेला टक्का हा मतदारांच्या सकारात्मक विचारांना दर्शवतो. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांमुळे जनता पुन्हा एकदा दक्षिण मध्य मुंबईत नक्कीच भगवा फडकावेल, असा विश्वास आम्हाला आहे. तसेच देशातही पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे, ही जनतेची इच्छा वास्तवात उतरणार आहे. - राहुल शेवाळे, महायुतीचे उमेदवार

Web Title: Increasingly our opinion! Alliance, Greater Accomplishment Claims-counter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.