Join us

मनसेच्या इशाऱ्यानंतर फिल्म सिटीच्या सुरक्षेत वाढ; जान कुमार सानूला दिलाय २४ तासांचा अल्टिमेटम

By मुकेश चव्हाण | Updated: October 28, 2020 19:48 IST

सध्या सुरु असलेलं  १४ व्या हंगाम लोक फारसे बघत नाही. त्यामुळे टीआरपी मिळत नाही. त्यासाठी कलर्स मराठीने हा स्टंट केलेला आहे.

मुंबई: गायक जान कुमार सानूला मनसेनं थेट धमकी दिली आहे. मला मराठी भाषेची चीड येते, असं विधान जान कुमार सानूनं बिग बॉसमध्ये केलं. यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी जान कुमार सानू याच्यासह कलर्स वाहिनीलाही इशारा दिला आहे. 

अमेय खोपकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉस सुरु आहे. मात्र सध्या सुरु असलेलं  १४ व्या हंगाम लोक फारसे बघत नाही. त्यामुळे टीआरपी मिळत नाही. त्यासाठी कलर्स मराठीने हा स्टंट केलेला आहे. जान कुमार सानूचं हे वाक्य वाहिनीला एडिट करत आलं असतं. मात्र त्यांनी टीआरपीसाठी हे वाक्य वगळलं नाही, असा आरोप अमेय खोपकर यांनी केला आहे. 

मी वाहिनीला फोन करुन या संदर्भात जाब विचारलेला आहे, अशी माहिती अमेय खोपकर यांनी दिली आहे. तसेच जान कुमार सानूने येत्या २४ तासांत 'बिग बॉसच्या शो'मध्ये माफी मागितली नाही तर, उद्यापासून बिग बॉसचं शूटिंग बंद करु, असा इशारा देखील अमेय खोपकर यांनी दिला आहे. मनसेच्या या इशाऱ्यानंतर आता बिग बॉसची शूटिंग होणाऱ्या फिल्म सिटीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

दरम्यान, बिग बॉसच्या १४ व्या हंगामात निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत होती. त्यावरून जाननं राग व्यक्त केला. मला मराठी भाषेची चीड येते, असं जान कुमार सानूनं म्हटलं होतं. 

कलर्सनं मागितली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफी-

मराठीचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानूविरोधात मनसे, शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर बिग बॉस कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या 'कलर्स' वाहिनीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माफी मागितली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्यानं आम्ही माफी मागतो, असं कलर्सनं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

'२७ ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या बिग बॉसच्या एपिसोडसंदर्भात काही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्याची दखल घेऊन संबंधित भाग सर्व एपिसोड्समधून काढून घेण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मराठी भाषेसंदर्भातल्या विधानामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही माफी मागतो. आम्ही मराठी प्रेक्षकांचा आदर करतो. भारतातल्या सगळ्याच भाषणांचा आम्ही सन्मान करतो,' असं कलर्सनं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

कोण आहे जान कुमार सानू?

जान कुमार सानूचं मूळ नाव जयेश भट्टाचार्य आहे. तो प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा आहे. संगीत क्षेत्रात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकायचं असल्यानं मी माझ्या नावापुढे त्याचं नाव लावतो, असं जाननं टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. 

टॅग्स :मनसेराज ठाकरेबॉलिवूडमहाराष्ट्रपोलिस