पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा; किडनी स्टोनचा धोका टाळा! नेमकी कोणती आणि कशी काळजी घ्यावी? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 18:24 IST2025-04-22T18:17:01+5:302025-04-22T18:24:38+5:30
गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहत आहेत.

पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा; किडनी स्टोनचा धोका टाळा! नेमकी कोणती आणि कशी काळजी घ्यावी? वाचा...
गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहत आहेत. मुळात अतिरिक्त घाम आल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने या काळात पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे, असे आवाहन वैद्यकीय तज्त्रांनी केले आहे. अशा परिस्थितीत पाणी कमी प्यायल्यास किडनी स्टोनचा धोका उद्भवू शकतो, असा इशाराही मूत्रविकार तज्त्रांकडून दिला जात आहे. त्यामुळे दिवसात २ ते ३ लीटर पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ठराविक मात्रेपेक्षा अधिक किंवा कमी पाणी शरीरात झाले तर वाईट परिणाम शरीराला भोगावे लागतात. शरीरात ६० ते ७० टक्के पाणी असते. शरीराला अन्न आणि पाण्याची गरज असते. परंतु घाम आणि मूत्राद्वारे शरीरातून बाहेर पडते. तसेच व्यायाम किंवा उष्णतेमुळे डीहायड्रेशन मोठ्या प्रमाणात होते. त्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होत असतो. त्यामुळे चक्कर येणे, उलट्या होणे, असे प्रकार वाढीस लागतात. या काळात शरीरात पाणी कमी असल्यामुळे किडनी स्टोनसारख्या व्याधीला सामोरे जावे लागते.
७० टक्के पाण्याचे प्रमाण शरीरात राखणे आवश्यक असते. उन्हाळ्यात घाम जास्त येत राहिल्यास ती पाण्याची कसर लगेच भरुन काढावी लागते.
शरीराचे तापमान योग्य ठेवण्यासाठी काय काळजी घ्याल?
१. या काळात दररोज पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. तरुणांना दोन ते तीन लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच सिट्रस फळांचा आहारात जास्तीत जास्त वापर करतानाच त्याचा ज्यूस प्यावा.
२. सब्जा आणि चिया सीड्स घालून पाणी प्यावे. यामुळे शरीरातील तापमान योग्य पद्धतीने राहते. पोटदुखी आणि लघवीला जळजळ वाटल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उन्हाळ्यात पुरेशा प्रमाणात पाणी गरजेचे असते. ही माहिती अनेकवेळा डॉक्टरांनी दिलेली असते. मात्र, अनेक नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे काही वेळा नागरिकांना किडनी स्टोनचा त्रास होतो. त्यामुळे लघवीतून रक्त येणे, जळजळ होणे, अशा तक्रारी उद्भवतात. काही वेळा औषधाने या तक्रारी बऱ्या होतात. तर काही वेळा याकरिता शस्त्रक्रियेची आवश्यकता लागते.
- डॉ. मंगेश पाटील, मूत्रविकार तज्त्र, सैफी हॉस्पीटल