'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 03:47 PM2024-02-08T15:47:26+5:302024-02-08T15:48:52+5:30

Encounter Specialist Pradeep Sharma : अँटेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत.

Income Tax Department Raids On The House Of Encounter Specialist Pradeep Sharma, Andheri, Mumbai | 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

मुंबई : एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी आज आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केल्याचे वृत्त आहे. प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आहेत. मुंबई अंडरवर्ल्डमधील शेकडो गुन्हेगारांचा खात्मा केल्यामुळे त्यांची एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख बनलेली होती. दरम्यान, आयकर विभागाने त्यांच्या घरी छापा टाकल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी येथील  प्रदीप शर्मा यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. एका माजी आमदाराच्या प्रकरणामध्ये आयकर विभागाची कारवाई सुरू असल्याचे समजते. तसेच, या प्रकरणात आयकर विभागाकडून इतर काही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे. मात्र, याप्रकरणी सविस्तर माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

दरम्यान, अँटेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत. याच प्रकरणात काही काळ त्यांनी तुरुंगवास भोगला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना जामीन दिला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत.

वादग्रस्त कारकीर्द
प्रदीप शर्मा १९८३ मध्ये पोलीस दलात दाखल झाले होते. त्यांची कारकीर्द अतिशय वादात राहिली. रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचा बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध अशा आरोप प्रकरणात २००८ मध्ये प्रदीप शर्मा यांना निलंबित करण्यात आले होते. तसेच, २००९ साली रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या यांच्या हत्येप्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह एकूण १३ पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, चार वर्षे ठाणे मध्यवर्ती कारागृहात काढल्यानंतर २०१३ साली प्रदीप शर्मांची सुटका झाली होती.

Web Title: Income Tax Department Raids On The House Of Encounter Specialist Pradeep Sharma, Andheri, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.