... तर मुंबईची तुंबई ठरलेलीच; मुसळधार पावसामध्ये पाण्याचा निचरा करण्याची क्षमता तोकडीच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 09:38 AM2024-07-10T09:38:37+5:302024-07-10T09:41:12+5:30

मुंबईत दर तासाला ५० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास साचणारे पाणी उपसणारी कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नाही.

in mumbai water drainage capacity during heavy rains is limited bmc does not have any system to pump water | ... तर मुंबईची तुंबई ठरलेलीच; मुसळधार पावसामध्ये पाण्याचा निचरा करण्याची क्षमता तोकडीच

... तर मुंबईची तुंबई ठरलेलीच; मुसळधार पावसामध्ये पाण्याचा निचरा करण्याची क्षमता तोकडीच

मुंबई : शहरात सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा निचरा करण्यात पर्जन्य जलवाहिन्यांच्या, नद्या-नाल्यांच्या मर्यादा आणि क्षमता तोकड्या असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. मुंबईत दर तासाला ५० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास साचणारे पाणी उपसणारी कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नाही. पावसाचे पाणी वेगाने वाहून नेण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या, नद्या-नाले यांची क्षमता आणखी वाढवणे आता अशक्य आहे.

२६ जुलैच्या जलप्रलयानंतर मुंबईच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी काय करावे लागेल, पाणी नेमके का तुंबते, याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांची समिती नेमली होती. या समितीने बृहन्मुंबई स्टोर्म वाटर ड्रेनेज (ब्रिमस्टोव्हॅड) प्रकल्प राबविण्याची सूचना केली होती. हा प्रकल्प राबविण्यास सुरुवात होण्यापूर्वी पावसाचे पाणी वाहून नेण्याची पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता तासाला फक्त २५ मिलिमीटर होती. त्यापेक्षा जास्त पाऊस झाला, तर पाणी तुंबणार, हे स्पष्ट होते. त्यामुळे पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविण्याची शिफारस चितळे समितीच्या अहवालात करण्यात आली होती. त्याचबरोबर साचलेले पावसाचे पाणी समुद्रात फेकण्यासाठी अतिरिक्त पंपिंग स्टेशन उभारणे, नाले रुंद करणे, मिठी नदीसह अन्य नद्यांचे पात्र रुंद करणे, त्यांची खोली वाढवणे आदी महत्त्वाचे उपाय सुचविण्यात आले होते. मात्र, हे उपाय योजण्यास खूप बिलंब झाला. २००५ नंतर आता कुठे पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता २५ वरून ५० मिलिमीटर एवढी झाली आहे. आता क्षमता आणखी वाढवणे शक्य नाही.

मिठीसह अन्य नद्यांच्या रुंदीकरणाची कामे-

१) मिठीसह अन्य नद्यांच्या रुंदीकरणाची कामे हाती घेतली आहेत. मात्र, अनेक वर्षे उलटूनही कामे काही पूर्ण झालेली नाहीत. मिठी नदीवर तर हजारो कोटी रुपये खर्च झाले आहेत.

२) मात्र, आजही मुसळधार पाऊस झाला आणि नदीचे पात्र भरले की काठावरच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागते. सुदैवाने अलीकडच्या काळात तशी वेळ आलेली नाही.

३) अनेक भागांतील नालेही रुंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पाणी वाहून नेण्याची त्यांचीही क्षमता वाढली आहे. मात्र एका मर्यादपलीकडे काहीच करता येत नाही.

अशा आहेत मर्यादा...

१) मुंबईत नदी-नाल्यांच्या आसपास बांधकामे झाल्याने ते आणखी रुंद करता येत नाहीत. पर्जन्य जलवाहिन्यांचाही आणखी विस्तार होऊ शकत नाही.

२) मुसळधार पाऊस आणि त्याचवेळी समुद्राला भरती आल्यास पाण्याचा निचरा होण्यास आजही अडथळा येत आहे. अशा वेळी भरती आल्यास समुद्राचे पाणी शहरात शिरू नये, यासाठी फ्लड गेट बंद करावे लागतात. समुद्राचे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये घुसून उलटे शहराच्या आत येत नाही. मात्र हे गेट बंद झाल्यास शहराच्या आतील भागांत साचलेले पाणी बाहेर, म्हणजे समुद्रात फेकले जात नाही. त्यासाठी पाऊस कमी होणे आणि भरती ओसरणे हे दोनच पर्याय आहेत.

Web Title: in mumbai water drainage capacity during heavy rains is limited bmc does not have any system to pump water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.