मुंबई - मागील २ दिवसांपासून मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल सुरू आहेत. मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या लोकल सेवेला पावसामुळे फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा बंद आहेत. त्यात स्टेशनवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाल्याचं चित्र दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे या प्रमुख रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. घरी परतणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे.
सकाळी कामावर निघालेले चाकरमानी आता रेल्वे स्टेशनवर अडकून आहेत. मध्य रेल्वेची सीएसएमटी ते ठाणे वाहतूक बंद आहे. ठाण्यापासून पुढे लोकल सेवा सुरू आहे. हार्बर रेल्वे सीएसएमटी ते मानखुर्द बंद ठेवण्यात आली आहे. वाशी पनवेल रेल्वे सेवा सुरू आहे. पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सुरळीत असली तरी मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी लोकलमधून रेल्वे ट्रॅकवर उतरून चाकरमानी पायपीट करत असल्याचे दिसून येत आहे.
रेल्वे प्रवासी संतापले...
लोकल सेवा ठप्प असल्याने रेल्वे प्रवासी प्रशासनावर संतापले आहे. तासनतास वाट पाहूनही रेल्वे सुरू होत नाही. लोकलमध्ये प्रवासी खचाखच भरले आहेत. सामान्य नागरिकांकडे लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ नाही. कुर्ला-सायन दरम्यान पाणी भरलं अशी सूचना रेल्वेकडून केली जात आहे. मागील अनेक वर्ष आम्ही लोकलने प्रवास करतोय. दरवर्षी पाणी भरल्याने लोकल ठप्प होते. रेल्वे प्रशासन दर आठवड्याला मेगा ब्लॉक घेते मग जिथे पाणी तुंबते तिथे पर्यायी व्यवस्था का केली जात नाही असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.
तर आम्ही फुकट प्रवास करत नाही, पैसे देऊन प्रवास करतो. प्रत्येकवेळी मोठ्या संख्येने टीसी पहारा देत विना तिकीट लोकांना पकडतात, त्यांच्याकडून दंड वसूल करतात. मग आज प्रवाशांना जो त्रास होतोय त्याकडे कोण लक्ष देत आहे. आज कुणी आम्हाला पाणी विचारत नाही. आम्हाला घरी जाता येत नाही. दादर स्टेशनला शौचालयाची सोय नाही, बसण्यासाठी बाकडे नाहीत. रेल्वे प्रवाशांना वेठीस धरलं जाते. महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे असा रागही प्रवाशांनी व्यक्त केला आहे.