मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 06:35 IST2025-12-20T06:34:59+5:302025-12-20T06:35:37+5:30
उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी भेट घेतली.

मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव?
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपविरोधी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी. काँग्रेसने एकत्र येण्यास नकार दिला, तर ठाकरे बंधूसोबत मिळून निवडणूक लढवावी. तसेच पक्षाला २२ ते ३० जागा मिळाव्यात, असा प्रस्ताव उद्धवसेनेला पाठविण्यात यावा, असा निर्णय शरद पवार गटाच्या मुंबई पदाधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी भेट घेतली. त्यावेळी पवार यांनी सन्मानजनक जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत ठाकरे बंधूंसोबत जाण्याचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी मुंबई प्रदेश कार्यकारिणीची शुक्रवारी बैठक बोलावली. आगामी महापालिका निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक मजबुती, स्थानिक प्रश्न आणि युतीचे अंतिम स्वरूप यावर बैठकीत चर्चा झाली.
पूर्व उपनगरात पक्षाची ताकद
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत एकसंघ राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील ५ जणांनी अन्य पक्षात, तर २ माजी नगरसेवक अजित पवार गटात गेले आहेत. त्यामुळे, शरद पवार गटाकडे २ माजी नगरसेवक उरले आहेत. मात्र, पूर्व उपनगरात पक्षाची ताकद आहे.
शिवाय, पश्चिम उपनगर व मुंबई शहरातील मुस्लिम पट्टयात राष्ट्रवादीचा मतदार आहे. त्यामुळे २२ ते ३० जागांची मागणी उद्धवसेनेकडे करावी. मात्र, याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
"...तर २२७ पैकी २०० जागा जिंकू
लोकसभेला कमी जागा घेऊनही त्यातील जास्त जागा जिंकल्या. त्याप्रमाणेच मुंबईतही कमी जागा घेऊन त्यातील जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न आहे. मनसेमुळे काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडली. पण उद्धवसेना व मनसेसोबत जाण्याकडे नेत्यांचा कल अधिक आहे. उद्धवसेना, मनसे, स्वाभिमान, काँग्रेस व शरद पवार गट एकत्र येऊन निवडणूक लढल्यास महापालिकेच्या २२७ पैकी २०० जागा जिंकू, असा आम्हाला विश्वास आहे."
- अॅड. अमोल मातेले, अध्यक्ष, मुंबई युवक काँग्रेस