जवळपास १७ लाख खर्चूनही वधूला लग्नास नकार; नवरदेवासह सहा जणांवर पोलिसात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 10:17 AM2024-06-21T10:17:06+5:302024-06-21T10:22:37+5:30

लग्नाच्या एक दिवसआधी लग्नाला नकार दिल्याने डॉक्टरच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी नवरदेवासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

in mumbai for refusing marry a day before wedding oshiwara police have registered case against six people including groom | जवळपास १७ लाख खर्चूनही वधूला लग्नास नकार; नवरदेवासह सहा जणांवर पोलिसात गुन्हा

जवळपास १७ लाख खर्चूनही वधूला लग्नास नकार; नवरदेवासह सहा जणांवर पोलिसात गुन्हा

मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून हुंडा तसेच अन्य भेटवस्तू मागत १६ लाख ७८ हजार रुपयांचा खर्च करण्यास ३१ वर्षीय महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांना भाग पाडले. मात्र, लग्नाच्या एक दिवसआधी लग्नाला नकार दिल्याने डॉक्टरच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी नवरदेवासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जोगेश्वरीत राहणाऱ्या महिला डॉक्टरने बीएचएमएसचे शिक्षण घेतले असून, त्या अंधेरीतील एका रुग्णालयात नोकरी करतात. विवाहासाठी त्यांना वडिलांच्या मित्राच्या ओळखीने नदीम खान याचे स्थळ आले. 

वधू - वराची पसंती झाल्यानंतर एकमेकांना काही रक्कम शगुन म्हणून देण्यात  आली. मार्च २०२३मध्ये विवाहाची बोलणी झाली असता नदीमचे वडील शमीम अहमद यांनी हुंड्यापोटी १३ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत आहे. मात्र, महिला डॉक्टरच्या नावे प्लॉट असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी १० लाखांचा खर्च करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर रितीरिवाजाप्रमाणे एकमेकांना कपडे, पैसे, अन्य भेट वस्तू देण्यात आल्या. मात्र, १३ लाख रुपये डॉक्टरच्या कुटुंबीयांनी न दिल्याने खान कुटुंबीय नाराज होते.

१) महिला डॉक्टर आणि नदीम यांचा विवाह उत्तर प्रदेश येथे १३ नोव्हेंबर २०२३ रोजी, तर स्वागत समारंभ नदीमच्या गावी १९ नोव्हेंबरला ठरविण्यात आला. खान कुटुंबीयांनी पाहुण्यांची व्यवस्था मुंबईतील हॉटेलमध्ये करायला सांगत रेल्वे तिकीट बुकिंगचे पैसेही मागितले.

२) त्यानंतर फ्रिज, वॉशिंग मशीन, भांडी, फर्निचर, असे १ लाख २६ हजार १३३ रुपयांचे सामानही महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी खान यांच्याकडे पाठविले. लग्नासाठी १२ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत हॉटेल आरक्षित केले होते. मात्र, १२ नोव्हेंबरला खान कुटुंबीय आलेच नाही. महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी फोन केला असता त्यांनी लग्नाला नकार दिला. 

३) महिला डॉक्टरची १६ लाख ७८ हजारांची फसवणूक केल्याचा आरोप असून, याप्रकरणी नदीमसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: in mumbai for refusing marry a day before wedding oshiwara police have registered case against six people including groom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.