डिलिव्हरी बॉयवर हल्ला, बाइकला ओव्हरटेक करत अडवलं; एक्स गर्लफ्रेंडचा प्रताप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 15:42 IST2024-06-22T15:39:24+5:302024-06-22T15:42:38+5:30
डिलिव्हरी बॉयवर दगडाने हल्ला केल्याची घटना मालाडमध्ये घडली आहे.

डिलिव्हरी बॉयवर हल्ला, बाइकला ओव्हरटेक करत अडवलं; एक्स गर्लफ्रेंडचा प्रताप!
मुंबई : डिलिव्हरी बॉयवर दगडाने हल्ला केल्याची घटना मालाडमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी माजी प्रेयसी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार प्रमोद गुप्ता (२१, रा. मालवणी गेट क्रमांक ७) हा एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याचे त्याच परिसरात राहणाऱ्या पिंकी सिंग (२०) हिच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र वर्षभरापूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर पिंकी आणि तिचा मित्र नाझी हे गुप्ता याला वरचेवर रस्त्यात अडवून त्याच्याशी भांडण करत असत.
१८ जूनला गुप्ता हा मालाडच्या ऑर्लम परिसरात डिलिव्हरी करण्यासाठी रामनगर गावठाण मार्गाने जात असताना मध्येच पिंकी आणि नाझी यांनी त्याची दुचाकी ओव्हरटेक करत थांबवली. त्यानंतर दोघांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचा जाब विचारल्यावर नाझी याने दगड उचलून गुप्ता याच्या डोक्यात मारला. तो त्याच्या कानाच्या वर लागल्याने गुप्ता याला चक्कर आली आणि तो डोके पकडून खाली बसला. त्यानंतर दोघांनीही तेथून पळ काढला. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेऊन गुप्ता याने मालाड पोलिसांत याप्रकरणी तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.