रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाले रडारवर; कुर्ला, कुलाबा, मालाड, चर्चगेट येथे कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 10:51 IST2024-07-03T10:46:44+5:302024-07-03T10:51:34+5:30
अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईचा वेग मुंबई महापालिकेने आणखी वाढवला आहे.

रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाले रडारवर; कुर्ला, कुलाबा, मालाड, चर्चगेट येथे कारवाई
मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईचा वेग मुंबई महापालिकेने आणखी वाढवला आहे. मंगळवारी पुन्हा मुंबईत विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर धडक कारवाई करून रस्ते आणि पदपथ मोकळे करण्यात आले. पालिका गेल्या तीन दिवसांपासून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करीत आहे.
मालाड, घाटकोपर, उच्च न्यायालय परिसर, कुर्ला, दहिसर, कुलाबा, चर्चगेट, दादर या भागातील फेरीवाल्यांना मंगळवारी हटवण्यात आले. दादरमध्ये तर सलग तिसऱ्या दिवशीही कारवाई सुरू होती. सोमवारी अंधेरी, वांद्रे मालाड रेल्वेस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या भागांत कारवाई करण्यात आली होती. दादर येथे कारवाई झाल्यानंतर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या भागाला अचानक भेट देऊन पाहणी केली होती.
घाटकोपरलाही बडगा-
मुंबईत सर्वच स्थानकांबाहेरील जागेवर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे पालिकेने रेल्वेस्थानक परिसरावर लक्ष केंद्रित केले आहे. घाटकोपर मेट्रो स्थानकाच्या खालीही मोठ्या प्रमाणावर फेरीवाले असतात. त्यांनाही हटवण्यात आले. चर्चगेट सबवे बाहेरील परिसरही मोकळा केला. कुर्ला स्थानकाबाहेरील बजबजपुरी हटवण्यात आली. या कारवाईसाठी मोठा पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे.