Join us  

'मातोश्री'वर ठाकरे गट-राष्ट्रवादी नेत्यांची महत्त्वाची बैठक; काँग्रेसला ठेवलं दूर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 5:29 PM

आमची राष्ट्रवादीची मानसिकता मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटासोबत जाण्याची आहे असं अजित पवार बोलले.

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीत वेगवान घडामोडी घडत आहे. आज रात्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी मातोश्रीवर शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. या भेटीत निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र या बैठकीत काँग्रेसला दूर ठेवले का असा प्रश्न आता निर्माण होत आहे. 

या बैठकीपूर्वी अजित पवार म्हणाले की, मला काँग्रेसबाबत काही सांगता येणार नाही. त्यांच्याबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेतेच बोलतील. आमची राष्ट्रवादीची मानसिकता मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटासोबत जाण्याची आहे. त्यात पक्ष, संघटना म्हणून ते मोठे आहेत. मुळात मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची ताकद आहे हे निर्विवाद सत्य आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंशी चर्चा करू. याअगोदरच त्यांच्याशी आम्हाला बरोबर घ्या अशी सकारात्मक चर्चा झाली होती अशी माहितीही त्यांनी दिली. 

शिवसेना-वंचित युतीला विरोध नाहीशिवसेना - वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? का गैरसमज पसरवत आहात असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना केला. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालय पार पडल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर वंचित बहुजन आघाडीने युती केली हे माध्यमातून समजले आहे. उद्धव ठाकरे यांची आज मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भेट घेणार आहोत. त्यावेळी यावर स्पष्टपणे चर्चा करु व त्यानंतर आमची भूमिका मांडू असं अजित पवार म्हणाले. 

त्याचसोबत उद्धव ठाकरे यांनी कुणाला मित्रपक्ष म्हणून घ्यायचं व त्यांच्या कोट्यातून काय द्यायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. राजकारणात मागच्या निवडणुकीत कुणी जागा पाडल्या याला काही अर्थ नसतो. राजकारणात येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आराखडे आखावे लागतात व राजकीय भूमिका मांडावी लागते. युती-आघाडी होते त्यावेळी 'मागचं झालं गेलं गंगेला मिळालं' असं करुन पुढे गेलो तरच योग्य गोष्टी घडतात असे स्पष्ट मतही अजित पवार यांनी व्यक्त केलं.

चिंचवड कसबा जागेवरही बैठकीत चर्चाचिंचवड आणि कसबा या दोन्ही जागांसंदर्भात पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली. आघाडी म्हणून शिवसेना, कॉंग्रेससोबत चर्चा करतोय. याशिवाय जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या निवडणूका लढवल्या जाव्यात ही भूमिका असून याबाबत अंतिम निर्णय झाल्यावर माध्यमांना सांगितला जाईल असं अजित पवार म्हणाले. आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये संघटना वाढ, विधानपरिषदेच्या निवडणूका, चिंचवड व कसबा पोटनिवडणुक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काय नीती असावी याबाबत चर्चा झाल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली. 

टॅग्स :अजित पवारउद्धव ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस