विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्वाचा निर्णय, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 09:18 PM2020-05-31T21:18:24+5:302020-05-31T21:30:58+5:30

विद्यापीठांच्या परीक्षा तसेच शैक्षणिक वर्षांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक झाली होती.

Important decision regarding final year examinations in the university, big announcement by uddhav thackery MMG | विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्वाचा निर्णय, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्वाचा निर्णय, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Next

मुंबई - एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घेऊन विद्यापीठांच्यापरीक्षा घ्या. त्यासाठी नेमकी परीक्षापद्धती आणि वेळापत्रक निश्चित करण्यासाठी विविध पर्याय पडताळून पाहवेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शनिवारी दिले होते. त्यानंतर, पुनश्च हरिओम म्हणत लॉकडाऊन संपुष्टात येण्यास सुरुवात झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यासोबतच, विद्यापीठातील अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत महत्वाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नसून त्यांना सरासरी पद्धतीने गुण दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 

विद्यापीठांच्या परीक्षा तसेच शैक्षणिक वर्षांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक झाली होती. या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागाचे सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ आदी सहभागी झाले. अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसेच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, पुनश्च हरि ओम म्हणत मिशन बिगेन अगेन म्हणजेच नव्याने सुरु करुयात असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. त्याचवेळी, अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा न घेता त्यांना सरकारी गुण देण्याचं ठरवल्याचंही जाहीर करण्यात आलं

''राज्यातील शेवटच्या वर्षात परीक्षा देणाऱ्या कितीतरी लाख विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. त्यांच्या भविष्याची जशी आम्हाला काळजी आहे, तशीच त्यांच्या आरोग्याचीही काळजी आम्हाला आहे. कारण, आमच्यातला पालक जिवंत आहे. मी शनिवारी राज्यातील सर्वच कुलगुरुंची बैठक घेतली. बहुतांश कुलगुरुंच्या सूचनाही सद्यस्थितीत परीक्षा घेता येणार नाहीत, अशाच आल्या आहेत. त्यामुळे, अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 

अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची आम्हाला चिंता आहे, म्हणून या सर्व विद्यार्थ्यांची गुणांची सरासरी करुन त्यांना अंतिम वर्षांच्या परीक्षेत गुण देण्यात येणार आहेत. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना या गुणांवर आक्षेप असेल, किंवा मला यापेक्षाही जास्त गुण मिळाले असते, असे वाटत असेल त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी सरकारतर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार'' असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

दरम्यान कोरोनाच्या संकटाला संधी मानून महाराष्ट्रातील प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यातील प्रादेशिक विषमता संपविण्यासाठी प्रयत्न करण्याचे, नव्या शिक्षण पद्धतीबाबत संशोधन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सध्या, शाळा किंवा महाविद्यालये सुरु करणे शक्य नाही, त्यामुळे ऑनलाईन व डिजिटल शिक्षणपद्धतीवर भर देण्याचंही मुख्यमंत्र्यांनी सूचवलं आहे. 
 

 

 

Web Title: Important decision regarding final year examinations in the university, big announcement by uddhav thackery MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.