‘प्रत्येक तालुक्यात समुपदेशन उपक्रम राबवा’; मुलांचा मेंदू वाचून सांगितले, कशात करावे करिअर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 13:52 IST2026-04-11T13:48:39+5:302026-04-11T13:52:11+5:30
दहावीनंतर पुढे कोणत्या विद्याशाखेत आपण प्रवेश घ्यावा, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे

‘प्रत्येक तालुक्यात समुपदेशन उपक्रम राबवा’; मुलांचा मेंदू वाचून सांगितले, कशात करावे करिअर...
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दहावीनंतर पुढील शैक्षणिक दिशा कोणती असावी, याबाबत शिक्षण विभागाच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरणाने मुंबईत विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्रीय कसोट्या घेऊन समुपदेशन केले. यामुळे विद्यार्थ्यांना दिशा ठरण्यास मदत झाल्याचे पालकांनी सांगितले. मात्र, मुंबईच्या प्रत्येक तालुक्यात असे समुपदेशन मिळावे घेण्याची गरज यावेळी पालकांनी व्यक्त केली.
दहावीनंतर पुढे कोणत्या विद्याशाखेत आपण प्रवेश घ्यावा, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. मुंबईत चिराबाजारातील ८ एप्रिल रोजी मारवाडी ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले गेले.
समुपदेशन सत्र
- करिअरबाबत अचूक निर्णय घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालक यांच्या मानसशास्त्रीय कसोट्या व समुपदेशन केले जाते.
- या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यासाठी प्रादेशिक विद्या प्राधिकरणाकडून ६ एप्रिल रोजी सुमारे २०० विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्रीय कसोट्या घेण्यात आल्या.
- या कसोट्यानंतर समुपदेशकांनी प्रत्येक विद्यार्थीनिहाय सारण्या, तक्ते आणि पर्सेन्टाईल गुणांकन केले.
विद्यार्थ्यांना स्वत:मधील गुण, मर्यादांची ओळख
या उपक्रमात ज्येष्ठ समुपदेशक शरद शिंपी, सुहास कदम, जयवंत कुलकर्णी अशा अनेक समुपदेशकांनी योगदान दिले. समुपदेशनानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांनी मानसशास्त्रीय कसोट्यांमुळे स्वतःमधील गुण आणि मर्यादा यामुळे स्पष्टपणे समजल्या. पुढे कोणत्या ज्ञानशाखेसाठी आपण पावले उचलावी, याबाबत बऱ्यापैकी निर्णय घेण्यास मदत होत असल्याचे पनवेल येथील पालक रीना रॉय यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्रीय कसोट्या कोणती विद्याशाखा निवडावी, यासाठी मदतकारक ठरतात. त्यासाठीच विद्या प्राधिकरणाने हा पुढाकार घेतला. पालकांच्या अपेक्षा खूप आहे, त्याबाबत वरिष्ठ पातळीवरून निर्देश आल्यास कार्यवाही केली जाईल.
-मनीषा पवार, प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, शिक्षण विभाग
शिक्षण विभागाने मोफत मानसशास्त्रीय कसोटी आणि समुपदेश याचे आयोजन केले. यामुळे विद्यार्थ्यांना पुढची दिशा ठरवणे सुकर झाले, परंतु मुंबईच्या प्रत्येक तालुक्यात हे मेळावे घेतले पाहिजे.
-अब्बास मर्चंट, पालक