Join us

Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 11:37 IST

Mumbai Heavy Rain Today: मुंबईत पुढील काही तासांत पाऊस आणखी वाढणार असून अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

Mumbai Rain News: मुंबईत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानंतर सोमवारीही मुसळधार पाऊस सुरूच आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, तर महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. पाऊस सुरुच असल्याने मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं असून त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. लोकल सेवा उशिराने सुरु असून रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दुसरीकडे मुंबई महापालिकेने मुसळधार पाऊस आणि भरतीचा इशारा दिला आहे.

रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत सरासरी २३.८१ मिमी, पूर्व उपनगरात २५.०१ मिमी आणि पश्चिम उपनगरात १८.४७ मिमी पाऊस पडला. काही ठिकाणी ४०-४५ मिमी पाऊस पडला. मुसळधार पाऊस असूनही, आयएमडीने रविवारी सकाळी पावसाची तीव्रता कमी झाल्याचे नोंदवले. रविवारी दिवसभरात कधी हलका तर कधी मुसळधार पाऊस पडत होता. त्यानंतर रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस सुरु झाला. सोमवारी सकाळी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे.

त्यामुळे मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने मध्यम ते मुसळधार पाऊस सुरूच राहणार असल्याचे म्हटलं आहे. तर रात्री जोरदार वाऱ्यासह खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि अनावश्यकपणे बाहेर पडू नये असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे. तसेच भारतीय हवामान खात्याच्या सकाळी १०:०० वाजेपर्यंतच्या पावसाच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार तासांत मुंबईत अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, सोमवारी संध्याकाळी ०६:५१ वाजता समुद्रात भरतीची वेळ असून तेव्हा भरतीची उंची सुमारे ३.०८ मीटरपर्यंत असणार आहे. समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना आणि मच्छिमारांना अतिरिक्त काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

 तसेच मुंबई पोलीस आयुक्तांकडूनही अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. "मुसळधार पाऊस सुरू असल्याने, अनेक भागात पाणी साचण्याच्या आणि दृश्यमानता कमी होण्याच्या घटना घडत असल्याने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कृपया अनावश्यक प्रवास टाळा, तुमच्या प्रवासाचे काळजीपूर्वक नियोजन करा आणि आवश्यक असेल तरच बाहेर पडा," असं आवाहन मुंबई पोलीस आयुक्तांनी केले आहे.

टॅग्स :मुंबईचा पाऊसपाऊसमुंबई महानगरपालिकामुंबई पोलीसवाहतूक पोलीस