Join us  

'मी हरलो, मला माफ करा'; जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 9:27 AM

जितेंद्र आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहेत. कोरोनाची लागण झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कातील व्यक्तीला करोना झाल्याने जितेंद्र आव्हाड यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबाची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबाला करोना झालेला नसल्याचे सिद्ध झालं. पंरतु आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे. याचदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी एक भावनिक पोस्ट फेसबुकवर पोस्ट केली आहे. 

जितेंद्र आव्हाडांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, Covid 19 चा गोंधळ हा साधारणत: 8-10 मार्चनंतर सुरु झाला. मी तेव्हाही माझ्या खात्याच्या मिटींगमधून गोरगरीब जनतेचे एस.आर.ए. चे प्रश्न सोडविण्यात मग्न होतो. माझे कर्मचारी तेव्हाही मला सांगायचे साहेब स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या. नका पुढे जाऊ. पण, गोर गरीबांसाठी काम केल पाहिजे ही साहेबांची असलेली शिकवण आणि थोडासा माझ्यातला अतिशहाणपणा… आणि मी काम करतच राहीलो. लॉकडाऊन पर्यंत मी काम करतच होतो. लॉकडाऊन नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली कि सगळ्या व्यवस्था कोलमडल्या. लोकांना बाहेर पडणे कठीण झाले. मग आता या लढाईत काय करायचं.

एक तरुणांची फळी जी गेले 30-40 वर्षे माझ्या बरोबर आहे आणि त्याच्यानंतर आलेली पिढी यांना सगळ्यांना एकत्र घेऊन मी निर्णय घेतला कि आपण काहीतरी चालू करुया. मित्र परिवाराला जमा केलं. 50 हजार किलो तांदूळ, 20 हजार किलो डाळ, 1 हजार किलो मिर्ची इ. साहित्य आणून 15 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु केले. प्रत्येक ठिकाणी 15-15 जबाबदार लोकांना नेमण्यात आलं. कळव्यासाठी वागळे इस्टेट येथील एका किचनमधून 15 हजार बंद पाकिटे मागविण्याचा निर्णय झाला. साधारण दिवसभरामध्ये सकाळ-संध्याकाळ 80 हजार लोकांना पाकिटे वाटली जायची. कळव्या-मुंब्र्यामध्येच नाही तर दिवा, घणसोली, ऐरोली, भिवंडी इथून सुद्धा पाकिटे घ्यायला लोक यायची. अर्थात गरिबीला जात, धर्म, पंथ, प्रांत काही नसतो हे माहित असलेला मी कार्यकर्ता असल्यामुळे याची कधी चिंता केली नाही. खिचडी बनत गेली आम्ही वाटत गेलो.

एक काळ असा आला अचानक कळायला लागल कि डॉक्टरांनी आपले दवाखानेच बंद केले. लोकांच्या तक्रारी यायला लागल्या कि आम्ही साध्या-साध्या आजारासाठी काय करायचं. परत हा मोठा प्रश्न निर्माण झाला. सगळ्या डॉक्टरांची एकत्रित बैठक घेतली. पोलीसांनी देखील चांगले सहकार्य केले. कळव्यामध्ये ही बैठक झाली आणि कळव्यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातील 9 कम्युनिटी क्लिनीक सुरु झाले. डॉक्टरांनी स्वत:च्या हिमतीवर Risk घेत, आम्ही लढू असे म्हणत हे कम्युनिटी हेल्थ केअर क्लिनिक सुरु केले. कालपर्यंत हे हेल्थ केअर क्लिनिक चालू होते. आतापर्यंत ह्या हेल्थ केअर क्लिनिकच्या माध्यमातून कळव्यामधील जवळ-जवळ 10 हजार पेशंट्स तपासले गेले. हे सगळे पेशंट्सना साध्या-साध्या आजाराने आजारी होते. त्यांना कळव्यात डॉक्टरच मिळाले नसते. कारण सगळ्याच डॉक्टरांनी आप-आपली क्लिनीक बंद करुन टाकली होती. मुंब्र्यामध्ये एक फक्त कोरोना केअर सेंटर सुरु केलंअसं आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांची संपूर्ण फेसबुक पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा 

 

बंगल्यावरील मारहाण प्रकरणाचा देखील केला उल्लेख

अधे-मधे अनंत करमुसेचे प्रकरण झाले. करमुसेने केल ते एकदम बरोबर केलं. माझे अर्धनग्न चित्र फेसबुकवर टाकलं. 2017 सालच्या पोस्टमध्ये तो सन्मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांना शरदुद्दीन म्हणतोय. एकदम चांगल काम करत होता. सगळ्यांच्या समोर व्हिलन जितेंद्र आव्हाड. मला समजत नाही कि सगळ्यांना मी एवढा का खूपतो. त्याने माझे अर्धनग्न चित्र टाकलय ते चुकीच आहे अस म्हणायची हिम्मत कुणीच दाखवली नाही. किंवा त्यानंतर माझ्या पत्नीवर आणि मुलीवर बलात्कार करण्याच्या ज्यांनी धमक्या दिल्या त्याबद्दल कुणीच अवाक्षरही काढले नाही. ना त्यांना कोणी अटक केली, ना त्यांच्यावरती कारवाया झाल्या. आजही करमुसे हा त्याचे फेसबुक अकाउंट पोलीसांना उघडूच देत नाहीये. असो.., तो पोलीसी तपासाचा भाग आहे आणि याबाबत मला काही बोलायचे देखील नाही. पण, आज जेव्हा सगळी माध्यमं बोट जितेंद्र आव्हाडकडे दाखवत आहेत तेव्हा मात्र माझ मन हरल्यासारख झाल आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसजितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र