Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 05:37 IST

यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याने अशा व्यक्तींवर धडक कारवाईसाठी वाहतूक पोलिस ॲक्शन मोडवर आले असून, शनिवार, रविवारी त्यांनी सुमारे ९० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.

मुंबई :मुंबई-पुणे अंतर कमी करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बांधण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’चे लोकार्पण झाल्यानंतर यावरील ‘केबल स्टेड’ पुलावर सेल्फी  काढण्यासाठी वाहनचालक, प्रवासी मोठ्या प्रमाणात थांबत आहेत. यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याने अशा व्यक्तींवर धडक कारवाईसाठी वाहतूक पोलिस ॲक्शन मोडवर आले असून, शनिवार, रविवारी त्यांनी सुमारे ९० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.

राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?

‘मिसिंग लिंक’वरील तब्बल १८२ मीटर उंचीचा ‘केबल स्टेड’ पूल आकर्षण ठरला आहे. त्यामुळे प्रकल्पातील ८.८७ किमी लांबीच्या बोगद्याच्या प्रवेशद्वारावर थांबून अनेकजण छायाचित्रे, सेल्फी काढतात. या द्रुतगती मार्गावर भरधाव वेगाने वाहने धावत असल्याने अशा व्यक्तींच्या वाहनांना धडक बसून अपघात होण्याची शक्यता आहे. या भागात वाहने उभी करणे बेकायदेशीर आहे. मात्र, तरीही अनेकजण ती उभी करतात. त्यातून आता वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी पोलिसांनी या महामार्गावर वाहने तैनात केली असून, हे पथक एक्स्प्रेस वेवर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. वाहनांना ५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, भाजप प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनीही या मार्गावरील केबल स्टेड पुलावर वाहन थांबवून छायाचित्र काढले होते. ते समाजमाध्यमातून प्रसारित केले होते. त्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे.  

सीसीटीव्ही, स्वतंत्र नियंत्रण कक्षाची असणार करडी नजर

या ‘कनेक्टिंग लिंक’ प्रकल्पातील दोन बोगदे आणि दोन पुलांवर पूर्णपणे २४ तास सीसीटीव्हीद्वारे लक्ष दिले जात आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष असून, द्रुतगती मार्गावर थांबणाऱ्या गाड्यांची माहिती महामार्ग पोलिसांना दिली जाणार आहे, असा इशारा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिला आहे. तसेच सेल्फी, छायाचित्रे आणि रिल काढण्यासाठी थांबू नका, नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते. तसेच तुमच्यासह इतरांच्याही वाहनांना धोका होऊ शकतो, असेही ‘एमएसआरडीसी’ने म्हटले आहे.

ठळक मुद्दे

दंडात्मक कारवाई :  शनिवार-रविवारी

९० वाहनांवर कारवाई.

इशारा : केवळ दंडच नाही, तर धोकादायक वर्तन आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचे संकेत.

सुरक्षेचे आवाहन : रिल्स आणि छायाचित्रांसाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Selfie stop on Missing Link costly; traffic police fine 90 vehicles.

Web Summary : Mumbai-Pune Missing Link's cable bridge attracts selfie-seekers, risking accidents. Traffic police fined 90 vehicles over the weekend. CCTV surveillance and hefty fines are in place to deter stopping on the expressway.
टॅग्स :महामार्गमुंबईपुणे