'असा चौकीदार असेल तर मुलींना पोलीस संरक्षणाची गरज'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 18:24 IST2019-03-18T18:22:59+5:302019-03-18T18:24:29+5:30
काही महिन्यांपूर्वी मुली पळविण्याच्या वक्तव्यावरुन चर्चेत असणारे भाजपचे आमदार राम कदम यांनीही ट्विटरवर चौकीदार राम कदम असं नाव ठेवलं. मात्र याचाच आधार घेत काँग्रेसने मोदी कॅम्पेनवर टीका केली आहे.

'असा चौकीदार असेल तर मुलींना पोलीस संरक्षणाची गरज'
मुंबई - काँग्रेसच्या चौकीदार चोर है या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून मै भी चौकीदार ही मोहीम सोशल मिडीयावर सुरु करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर चौकीदार नरेंद्र मोदी असं नाव बदलण्यात आले. मोदींपाठोपाठ भाजपच्या सर्व मंत्र्यांनी, नेत्यांनी नावाच्या पुढे चौकीदार या शब्दाचा उल्लेख केला. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक आमदारांनी ट्विटरवर नावात बदल केला.
काही महिन्यांपूर्वी मुली पळविण्याच्या वक्तव्यावरुन चर्चेत असणारे भाजपचे आमदार राम कदम यांनीही ट्विटरवर चौकीदार राम कदम असं नाव ठेवलं. मात्र याचाच आधार घेत काँग्रेसने मोदी कॅम्पेनवर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी असा चौकीदार असेल तर देशातील मुलींना पोलीस संरक्षणाची गरज लागेल असा टोला भाजपला लगावला आहे.
असा चौकीदार असेल तर देशातील मुलींना पोलिस संरक्षणाची गरज लागेल. https://t.co/cMwa1RcLAW
— Sachin Sawant (@sachin_inc) March 18, 2019
मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला मुलगी पसंत असल्यास तिला पळवून आणू, असं बेताल वक्तव्य राम कदम यांनी दहिहंडी उत्सवात केलं होतं. त्यांच्या या विधानावर सर्वच स्तरातून टीका झाली होती, विरोधकांसह सर्वसामान्यांनी देखील राम कदम यांच्या विधानाबद्दल संताप व्यक्त केला होता. राज्य महिला आयोगानेही राम कदम यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्याची नोटीस पाठवली होती त्यावर राम कदमांनी आपला माफीनामा सादर केला होता. मात्र या वादग्रस्त वक्तव्यामुळे राम कदम राजकीय वर्तुळात नेहमी टीकेचा धनी बनून राहिले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चौकीदार या शब्दाला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्याचे कारणही तसेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात वारंवार येणारा उल्लेख तो म्हणजे मी देशाचा पंतप्रधान नसून चौकीदार आहे, जो देशाचं संरक्षण आणि तिजोरीचे रक्षण करण्यासाठी जनतेचा सेवक म्हणून पदावर आहे. मात्र नीरव मोदी, विजय माल्ल्या आणि अनिल अंबानी यांना राफेलचं कंत्राट दिल्यावरुन काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार कॅम्पेन उघडलं. याच चौकीदार शब्दाचा वापर काँग्रेसकडून पुरेपूर प्रचारात वापर करण्यात आला. चौकीदार चोर है या घोषणेने राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. तीन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये मै भी चौकीदार असा प्रमुख उल्लेख करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या चौकीदार चोर है या घोषणेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं त्यामध्ये मोदी म्हणाले की, मी देशाची सेवा करण्यासाठी चौकीदार आहे. पण मी एकटा चौकीदार नाही तर भ्रष्टाचाराविरोधात लढणारा प्रत्येक जण चौकीदार आहे. जो देशाची प्रगती करण्यासाठी मेहनत करतोय, तो चौकीदार आहे. आज देशातील प्रत्येक नागरिक चौकीदार आहे असं म्हणत मै भी चौकीदार ही मोहीम ट्विटरवर सुरु केली आहे