डोंगर तर असेल; पण वाडी नसेल, ईर्शाळगडाच्या ट्रेकर्संनेही गमावली हक्काची माणसं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 07:53 AM2023-07-21T07:53:39+5:302023-07-21T07:54:36+5:30

काल रात्री इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर त्याच्या पायथ्याशी असलेली वाडी मातीखाली गाडली गेल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे.

If there is a mountain; But if there is no wadi, the trekkers going to Irshalgad also lost their rights | डोंगर तर असेल; पण वाडी नसेल, ईर्शाळगडाच्या ट्रेकर्संनेही गमावली हक्काची माणसं

डोंगर तर असेल; पण वाडी नसेल, ईर्शाळगडाच्या ट्रेकर्संनेही गमावली हक्काची माणसं

googlenewsNext

प्रशांत ननावरे

मुंबई : आता फणसाचे गरे, वरण- भात कोण खाऊ घालेल? शिखरावर पोहोचण्यासाठी अवघा वीस टक्के डोंगर चढायचा शिल्लक असताना बिनदुधाच्या चहाची लागलेली तलफ कोण बरं भागवणार? पनवेलपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला इर्शाळगड म्हणजे हक्काची ट्रेकिंगची जागा. वीकेंडला कुठं ट्रेकला जायचं यावर एकमत होत नसेल किंवा ट्रेकिंगला जायचं की नाही, असं तळ्यातमळ्यात असेल, तर शेवटच्या क्षणी माथेरान नाहीतर इर्शाळगड या दोनपैकी कुठल्यातरी एका डोंगरावर चढाई करून यायचं असं कितीतरी वेळा केलंय.

काल रात्री इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर त्याच्या पायथ्याशी असलेली वाडी मातीखाली गाडली गेल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. कारण गेली अनेक वर्षे फक्त तो डोंगरच नाही, तर त्याच्या पायथ्याशी असलेल्या वाडीतील माणसांशी ऋणानुबंध जुळलेले होते. 
दरड कोसळल्याची घटना घडल्यानंतर आज एक दिवस राज्याचे मुख्यमंत्री चिखल-माती तुडवत परिस्थितीची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले, तर त्याचं सगळीकडे कौतुक होतंय; पण त्याच वाडीत राहणाऱ्या अनेक पिढ्या दररोज डोंगरावरून खाली-वर येत-जात असतात, हे माहीत असूनही त्याची दखल घेतली जात नव्हती. शेवटी काल होत्याचं नव्हतं झालं. शहराच्या झगमगाटापासून वर डोंगरावर कुठलीही तक्रार न करता हसतमुखानं राहणाऱ्या लोकांच्या डोळ्यात आज आसवं दिसतायत. अनेकांच्या डोक्यावरील छप्पर उडालंय आणि काहींनी तर आप्तेष्टांनाही गमावलंय. 

सह्याद्रीत असंख्य लोक ट्रेकिंगला जात असतात. वाड्यागावांतील लोकांकडे मुक्काम करतात, जेवतात आणि अनेक संस्था आपल्यापरीने नियमितपणे मदतही करतात. विविध माध्यमांतून आपली निरीक्षणं मांडत असतात; पण क्वचितच त्याची दखल घेतली जाते. पर्यावरणाचा समतोल ढासळतोय या बोगस गप्पा असल्याचं तेव्हा भासवलं जातं; पण इर्शाळगडासारख्या घटना त्यावर वारंवार शिक्कामोर्तब करतायत, हे आपल्याला कधी उमजेल? 
पुढच्यावेळी ट्रेकला गेल्यावर डोंगर तर असेल; पण वाडी नसेल, कदाचित काही चेहरे पुन्हा कधीच दिसणार नाहीत. ही घटना का आणि कशामुळं घडली याचं योग्य परीक्षण न करता सरकार सरसकट काहीतरी निर्बंध आणेल. हळूहळू माणूस निसर्गापासून लांब जातोच आहे; पण माणसंही एकमेकांपासून तोडली जातायत, हे सर्वांत मोठं दुर्दैव.

Web Title: If there is a mountain; But if there is no wadi, the trekkers going to Irshalgad also lost their rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.