Join us
Daily Top 2Weekly Top 5

जराही लाज असेल तर पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागावी, काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 17:41 IST

शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणा-या प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देताना भाजपला लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवाल काँग्रेस-राष्ट्रवादीने केला आहे. तसेच जराही लाज असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

मुंबई - दहशतवादी ते भाजप उमेदवार या प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या प्रवासात भाजपचे मोठे योगदान राहिले आहे. भाजपचा खोटा राष्ट्रवाद आणि बेगडी देशप्रेमाचा बुरखा फाटला असून महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणा-या प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देताना भाजपला लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवाल काँग्रेस-राष्ट्रवादीने केला आहे. तसेच जराही लाज असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

गांधी भवन येथे काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपावर टीका केली आहे. यावेळी बोलताना सचिन सावंत म्हणाले की, प्रज्ञा सिंह यांनी महाराष्ट्राचे महान वीरपुत्र शहीद हेमंत करकरे यांचा अवमान केला आहे. हा फक्त करकरेंचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि शहीदांचा अवमान आहे.

शहीदांच्या शौर्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करणा-या पंतप्रधान मोदी आणि भाजपने तात्काळ माफी मागावी आणि प्रज्ञा ठाकूर यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली. तसेच प्रज्ञा ठाकूरच्या वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी अद्याप साधा निषेधही केला नाही असा आरोप केला.  

नवाब मलिक म्हणाले की, भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देवून दहशतवादाला समर्थन दिले आहे हे स्पष्ट होत असून साध्वीच्या रुपाने भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे. भाजप दहशतवाद्यांशी लढत असल्याचे ढोंग करत आहे हे स्पष्ट असून भाजपचा खरा चेहरा उघडा पडला आहे. असं सांगत साध्वी यांच्या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला.

भाजप हेमंत करकरे यांचा देशद्रोही बोलून अपमान करत आहे. त्यामुळे या सरकारला आणि भाजपाला नैतिक अधिकार राहिलेला नाही त्यामुळे यांना जनताच पराभूत करणार असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला. तसेच महाराष्ट्राचा अवमान केल्याबद्दल मोदी शाह यांना आनंद होत असेल पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपला हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहताना लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवाल काँग्रेस-राष्ट्रवादीने केला. आता भाजपने शहीद करकरेंना देशद्रोही ठरवले आहे त्यामुळे त्यांच्या कुटुबियांना प्रचंड वेदना होत असतील. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष शहीद करकरे कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असंही नवाब मलिक आणि सचिन सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :लोकसभा निवडणूककाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेससाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरनरेंद्र मोदी