राज ठाकरेंना अटक झाली तर मनसैनिक रस्त्यावर उतरेल, सरकारनं तयार राहावं: संदीप देशपांडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 15:23 IST2022-05-03T15:23:04+5:302022-05-03T15:23:44+5:30
औरंगाबादमधील सभेला ज्या अटी आणि शर्थी घातल्या होत्या तेव्हाच कळालं होतं की हे सारं गुन्हा दाखल करण्यासाठी सुरू आहे. पण राज ठाकरे आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत

राज ठाकरेंना अटक झाली तर मनसैनिक रस्त्यावर उतरेल, सरकारनं तयार राहावं: संदीप देशपांडे
मुंबई
औरंगाबादमधील सभेला ज्या अटी आणि शर्थी घातल्या होत्या तेव्हाच कळालं होतं की हे सारं गुन्हा दाखल करण्यासाठी सुरू आहे. पण राज ठाकरे आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि महाराष्ट्र सैनिक साहेबांच्या आदेशांचं पालन करेल, असं विधान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. राज ठाकरेंविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत बोलत असताना त्यांना अटक केली जाऊ शकते असं विचारण्यात आलं असता संदीप देशपांडे यांनी असं झाल्यास मनसैनिक रस्त्यावर उतरेल, असं म्हटलं आहे.
"जर आम्हाला असं अन्यायकारकरित्या अडकविण्याचा प्रयत्न केला जात असेल तर सरकारनं तयार राहावं. राज ठाकरेंना अटक झाली तर महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरेल. आमच्यावर कितीही केसेस पडू द्यात आम्ही घाबरत नाही. आजही आमच्यावर अनेक केसेस आहेत. आम्ही कायदेशीर लढाई तर लढूच पण साहेबांना अटक झाली तर महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही", असं संदीप देशपांडे म्हणाले.
राज ठाकरेंना अटक करण्याचा डाव
मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही सरकारचा राज ठाकरेंना अटक करण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांची पुढची प्रक्रिया त्यांना अटक करण्याचीच असेल. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतली. आज त्यांच्याच मुलाचं सरकार आहे आणि भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंविरोधात जर असं षडयंत्र केलं जाणार असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं अविनाश जाधव म्हणाले.