Disha Salian Case Reopened: दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षांनी पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या प्रकरणाबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठं विधान केले आहे. बाप कुणालाही घाबरत नाही. एखादा बाप पाच वर्ष शांत कसा राहू शकतो?, असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर आव्हाड यांनी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि आदित्य ठाकरे, सूरज पांचोलीसह इतरांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाने राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
दिशा सालियन प्रकरण : जितेंद्र आव्हाडांची भूमिका काय?
जितेंद्र आव्हाड म्हणाले, "दिशा सालियन प्रकरणाबद्दल बोलत असताना आमची बाजू मुनगंटीवारांनी व्यवस्थित मांडली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, सूईभर पुरावा त्यांच्याकडे नाहीये, कुणाकडेच नाहीये. त्यांनी जे मांडले तेच खरे आहे. त्यांनी ते व्यवस्थित मांडले आहे."
"आरएसएसने औरंगजेबला कुलूप लावले, त्यामुळे..."
"तिच्या वडिलांनी कसं वागावं, यावर मी काही बोलत नाही. बोलू नये. काल औरंगजेबला आरएसएसने टाळे लावल्यानंतर विषय तर पाहिजे ना. महाराष्ट्राची दिशाभूल करायला, काल औरंगजेबला आरएसएसने कुलूप लावून टाकले. त्याला कबरीत परत बंद करून टाकलं. त्यामुळे काही तरी विषय पाहिजे", असे म्हणत हा मुद्दा चर्चेत येण्याबद्दल शंका व्यक्त केली.
त्या माणसाचं मुंडकं काढून टाकलं असतं - आव्हाड
"कसं आहे की, सगळ्या गोष्टी टीव्हीसमोर काय बोलायच्या? पाच वर्ष काय झालं. एखादा बाप पाच वर्ष शांत राहू शकतो? मी सुद्धा एका पोरीचा बाप आहे. माझ्या पोरीला बोट लागलं असतं, तर मी त्या माणसाचं मुंडकं काढून टाकलं असतं. बाप कुणाला घाबरत नाही. जाऊद्या. राजकारणाच्या सर्वच पातळ्या खालीच चालल्या आहेत. अजून यावर कोणी काय बोलायचं?", अशी खंत जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर बोलताना केली.
"माझं कशावरही प्रश्नचिन्ह नाहीये. मी स्पष्ट शब्दात सांगितलं की, सुधीर मुनगंटीवारांनी आमची बाजू मांडली आहे. आणि ते म्हणत आहेत, तीच बाजू योग्य आहे", अशीही भूमिका जितेंद्र आव्हाडांनी मांडली.