Join us

'मी शेती करणार नाही, राजकारण सोडणार नाही, उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना टोमणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 21:38 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर, मी पार्थला राजकारणाचा स्तर घसरला असून आपण शेती किंवा उद्योग करू, असा सल्ला दिल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मी वचन दिल्याप्रमाणे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा इशारा दिला आहे. मुंबईत रंगशारदा सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी मी शेती करणार नाही, मी राजकारण सोडणार नाही, असे म्हणत अजित पवारांना टोला लगावला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर, मी पार्थला राजकारणाचा स्तर घसरला असून आपण शेती किंवा उद्योग करू, असा सल्ला दिल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. पवारांच्या या शब्दावरुन उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना टार्गेट केलं.  मी राजकारण सोडणार नाही, शेती करणार नाही. शिवसेना ही सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना आहे. मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवूनच दाखवेन, असं म्हणत उद्धव यांनी अजित पवारांना टोला लगावला. तसेच आम्ही सूडाचे राजकारण कधीच केलं नाही, आम्ही सुडाने वागणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादीलाही टार्गेट केलं. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना एक ना एक दिवस मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसल्याशिवाय राहणार नाही, असे वचन दिले आहे. हे वचन पूर्ण करण्याची मी शपथ घेतली आहे. त्यामुळे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीबद्दल उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, युतीबद्दल भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याशी आमचे बोलणे झाले असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसराजकारण