"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 13:10 IST2025-11-23T13:07:45+5:302025-11-23T13:10:38+5:30
Anant Garje Wife: कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक असलेल्या अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी घरातच आयुष्य संपवले. या घटनेनंतर अनंत गर्जे यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत.

"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
Anant Garje News: कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंबईतील राहत्या घरात ही घटना घडली. गौरी यांच्या कुटुंबीयांना याप्रकरणात अनंत गर्जे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गर्जे यांच्यासमोरच गौरी यांनी आत्महत्या केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या आरोपांवर अनंत गर्जे यांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे.
वरळीतील राहत्या घरात गौरी पालवे यांनी आत्महत्या केली. अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या कारणावरून आणि वाद झाल्यानंतर त्यांनी आयुष्य संपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर अनंत गर्जे म्हणाले, "घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो. घरी पोहोचलो तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून २०व्या मजल्यावरच्या माझ्या घरात उतरलो. तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. गौरीला खाली उतरवून मी रुग्णालयात नेलं."
अनंत गर्जेचे विवाहबाह्य संबंध, गौरीने मेसेज बघितले
दरम्यान, डॉक्टर गौरी पालवे यांचे मामा शिवदास गर्जे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अनंत गर्जे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
"काल (२२ नोव्हेंबर) दुपारी एक वाजल्यापासून त्यांची भांडणं सुरू होती. अनंत गर्जेचे बाहेर संबंध होते. हे तिला माहिती होतं. तिने त्याकडे दुर्लक्ष केले. तिने त्याचे मेसेजही पाहिले होते. ते तिच्या वडिलांना पाठवून ठेवलेले आहेत. तो तिचा खूप छळ करत होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. माझी बहीण, मुलीचे वडील कालपासून पोलीस ठाण्यात बसून आहेत. सामान्य लोकांना न्याय मिळत नाही", असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
लग्नानंतर दहा महिन्यातच स्वतःला संपवले
डॉक्टर गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचा याच वर्षी विवाह झाला होता. ७ फेब्रुवारी रोजी त्यांचे लग्न झाले होते. ते मुंबईतील वरळी भागात राहत होते. दहा महिन्यातच गौरी यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गौरी यांचे आईवडील बीडवरून मुंबईत आले आहेत.
अंजली दमानियांनी व्यक्त केला संताप
या प्रकरणानंतर अंजली दमानिया यांनी गौरी यांच्या आईवडिलांसह पोलिसांची भेट घेतली. त्या म्हणाल्या, "न्याय कशाला म्हणायचे हे कळत नाहीये. डॉक्टर मुलीची आत्महत्या आहे. गौरी आत्महत्या करेल, अशी नव्हती. गौरीच्या आईवडिलांना रात्री सात वाजता हे कळलं. ते एका लग्नात होते. तिथून ते वरळी पोलीस ठाण्यात आले. त्यांना आपल्या मुलीला अशा अवस्थेत नायर रुग्णालयात बघावे लागले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोस्टमार्टेम रिपोर्टनंतर ३०२ चा गुन्हा दाखल करू असे पोलिसांनी सांगितले आहे", असे सांगत दमानियांनी या घटनेवर संताप व्यक्त केला.