'मी तुमचं हृदय सांभाळलंय!' दादर जिंकताच यशवंत किल्लेदारांचा उद्धव ठाकरेंना फोन; राज ठाकरेंसमोरही झाले होते भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 11:10 IST2026-01-17T11:09:52+5:302026-01-17T11:10:53+5:30
निवडणुकीच्या रणधुमाळीत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दादरच्या वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी दिमाखदार विजय मिळवला.

'मी तुमचं हृदय सांभाळलंय!' दादर जिंकताच यशवंत किल्लेदारांचा उद्धव ठाकरेंना फोन; राज ठाकरेंसमोरही झाले होते भावूक
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दादरच्या वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी दिमाखदार विजय मिळवला. या विजयानंतर किल्लेदार यांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन करून, "तुमचं दादर आम्ही सांभाळलंय, तुमचं हृदय मी सांभाळलंय," अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. त्यावर उद्धव ठाकरेंनीही, "शिवसेना भवन आता तुझ्या प्रभागात आहे, ते तुलाच सांभाळायचंय," असे म्हणत किल्लेदारांचे कौतुक केले. या भावनिक संवादामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
दादरमध्ये मनसेचा गुलाल!
दादर हा ठाकरे कुटुंबाचा बालेकिल्ला आणि शिवसेनेचे जन्मस्थान. या मतदारसंघात यावेळी मनसेचे यशवंत किल्लेदार आणि शिंदे गटाच्या प्रिती पाटणकर यांच्यात चुरशीची लढत झाली. मात्र, मराठी मतदारांनी किल्लेदार यांच्या पारड्यात आपले वजन टाकले. निकालाची अधिकृत घोषणा होताच मनसे कार्यकर्त्यांनी 'शिवतीर्थ'बाहेर गुलालाची उधळण करत जल्लोष केला. राज ठाकरे यांनीही बाल्कनीत येत कार्यकर्त्यांच्या उत्साहाला दाद दिली.
एबी फॉर्म ते विजय: किल्लेदारांचा प्रवास
या निवडणुकीची सुरुवात किल्लेदार यांच्यासाठी खूपच भावनिक होती. राज ठाकरे यांनी त्यांना पहिला 'एबी फॉर्म' दिला, तेव्हा किल्लेदारांच्या डोळ्यांत पाणी आले होते. तो विश्वास सार्थ ठरवत त्यांनी दादरचा गड राखला. ठाकरे बंधूंच्या युतीचा या विजयात मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे.
भाजप-शिंदे गटाची मुंबईवर पकड
एकूण निकालांचा विचार करता, मुंबई महानगरपालिकेत यावेळी ऐतिहासिक उलटफेर पाहायला मिळाला. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने ११४ हा बहुमताचा आकडा गाठत ठाकरेंची २५ वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. भाजपने ८८ आणि शिंदे गटाने २८ जागांवर विजय मिळवून मुंबईवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
शिवसेना भवनाची जबाबदारी आता किल्लेदारांवर
वॉर्ड १९२ मध्येच शिवसेनेचे मुख्यालय 'शिवसेना भवन' येते. उद्धव ठाकरेंनी किल्लेदारांना फोनवर बोलताना याच इमारतीचा उल्लेख केला. "शिवसेना भवन आता तुला सांभाळायचंय," हे विधान ठाकरे बंधूंच्या बदलत्या राजकीय समीकरणांचे आणि किल्लेदारांवर सोपवलेल्या विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे. दादरमध्ये झालेला हा विजय केवळ एका वॉर्डपुरता मर्यादित नसून, तो मराठी अस्मितेच्या मुद्द्याला मिळालेली मोठी कौल असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.