"लोकांनी धुतलेली पापं अंगाला चिकटतील म्हणून मी महाकुंभमेळ्यात गंगेमध्ये स्नान केलं नाही’’, सुनील राऊत यांचं विधान चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:35 IST2025-02-14T15:34:30+5:302025-02-14T15:35:18+5:30
Sunil Raut Statement on Mahakumbh 2025: प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातील स्नानाबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. ’लोकांनी धुतलेली पापं अंगाला चिकटतील म्हणून मी महाकुंभमेळ्या गंगेत स्नान केलं नाही’, असं विधान सुनील राऊत यांनी केलं आहे.

"लोकांनी धुतलेली पापं अंगाला चिकटतील म्हणून मी महाकुंभमेळ्यात गंगेमध्ये स्नान केलं नाही’’, सुनील राऊत यांचं विधान चर्चेत
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभमेळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या महाकुंभमेळ्यामध्ये संत, महंत, गरीब, श्रीमंतांपासून ते मोठमोठ्या राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी भेट देऊन त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान केलं आहे. दरम्यान, या महाकुंभमेळ्यातील स्नानाबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. ’लोकांनी धुतलेली पापं अंगाला चिकटतील म्हणून मी महाकुंभमेळ्या गंगेत स्नान केलं नाही’, असं विधान सुनील राऊत यांनी केलं आहे.
विक्रोळीमधील कन्नमवारनगर येथे एका कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना सुनील राऊत यांनी हे विधान केलं. ते म्हणाले की, मी महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराज येथे गेलो होतो. आजच सकाळी मुंबईत आलो. मुंबईत आल्यावर लोकांनी मला नमस्कार केला. पाया पडले. मी दोन दिवस मी प्रयागराज येथे मजा घेत होतो. कोणी किती पापं धुतली हे पाहात होतो. लोकांना ही पापं धुताना पाहिल्यावर ती पापं माझ्या अंगाला चिकटतील की काय असं वाटलं म्हणून मी तिथे स्नान केलं नाही, असं विधान सुनील राऊत यांनी केलं.
दरम्यान, प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावत त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान केलं आहे.