"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 15:52 IST2025-12-15T15:50:52+5:302025-12-15T15:52:12+5:30
ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि विनोद घोसाळकर यांच्या सून तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर पहिल्यांदाच विनोद घोसाळकर यांनी त्यांची भूमिका मांडली.

"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
"तिने आता निर्णय घेतलेला आहे. ती आता भाजपमध्ये आहे. मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्येच आहे. तिने मला याबद्दल कल्पना दिल्यानंतर मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सांगितले आहे. प्रवेशावर मी काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही", असे सांगत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांनी सून तेजस्वी घोसाळकर यांच्या पक्षप्रवेशापूर्वी झालेला घटनाक्रम सांगितला. अभिषेक असता, तर हा प्रश्नच आज आला नसता. आपण मुलाचे कान धरू शकतो, सुनेचे कान धरू शकत नाही, असे म्हणताना घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी आले.
एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना विनोद घोसाळकर म्हणाले, "तिने काय केलं, याबद्दल मी काही बोलू शकत नाही. जरी ती माझी सून असली, तरी तिचा निर्णय तिला घेण्याचा अधिकार आहे. आज अभिषेक नाहीये. त्यामुळे मी याविषयावर काही प्रतिक्रिया देत नाही."
तेजस्वी आता मुंबै बँकेवर...
"अभिषेक मुंबै बँकेत दोन वेळा निवडून आला होता. मला एका संचालकांनी सूचवले होते की, मुंबै बँकेकडे मागणी करा की, अभिषेकच्या जागेवर तेजस्वीला घ्या. मी मागणी केली होती. त्याच्या वर्षभरानंतर त्यांनी तिची निवड केली. ते काय झाले मला माहिती नाही, पण ती मुंबै बँकेवर आता आहे", असे विनोद घोसाळकर यांनी सांगितले.
तेजस्वी यांच्यावर दबाब होता का? या प्रश्नावर बोलताना घोसाळकर म्हणाले, "मला नाही वाटतं. म्हणजे घरातून नव्हता. बाहेरून... त्यावर मी आता बोलू इच्छित नाही. कारण काही गोष्टींबद्दल पथ्य पाळण्याची तरी मला आवश्यकता आहे."
ती मला म्हणाली, डॅडी मी असे करतेय
"काल (रविवारी) संध्याकाळी माझ्या दोन्ही सूना, माझी पत्नी असे आम्ही सगळे बसलो होतो. तेव्हा ती म्हणाली की, डॅडी मी असं असं करत आहे. कुटुंबप्रमुख जे काही सांगायचं होतं, ते मी सांगितले. शेवटी निर्णय घेतल्यानंतर आम्ही काही दबाव आणू शकत नाही. तसा दबावही मला तिच्यावर टाकायचा नव्हता", असे विनोद घोसाळकर म्हणाले.
घोसाळकर झाले भावूक
"माझ्या पद्धतीने मी काही सांगण्याचा प्रयत्न केला. तिने निर्णय घेतला. मला जेव्हा कळलं तेव्हा मी राऊत साहेबांना, ठाकरेंना सांगितले. अभिषेक असता तर हा प्रश्नच आज आला नसता. अभिषेक आणि सूनबाई, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मुलाचं नातं आणि सूनेचं नातं, यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आपल्या मुलाचे आपण कधीही कान धरू शकतो, सूनेचे नाही धरू शकत", असे म्हणताना घोसाळकरांचा कंठ दाटून आला.