"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 10:39 IST2025-12-18T10:32:17+5:302025-12-18T10:39:46+5:30
Mumbai Politics: महापालिका निवडणुकीची घोषणा होताच मुंबईतील राजकारणाचा पारा चढू लागला आहे. भाजपकडून ठाकरे बंधूंना घेरले जात असून, शेलारांनी केलेल्या एका पोस्टला मनसेच्या नेत्याने उत्तर देत पलटवार केला.

"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
मुंबईत ठाकरे बंधु एकत्र लढणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात जागांच्या वाटाघाटी सुरू असतानाच भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना 'शिवतीर्थावरील चाफा' म्हणत डिवचलं. शेलारांनी विडबन कविता केली. त्याला मनसेच्या नेत्याने उत्तर देत पलटवार केला. शेलारांचा उल्लेख मुंबईची बुरशी असा करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुनावले.
मनसे आणि ठाकरेंची शिवसेना मुंबई, नाशिकसह ठाण्यातील महापालिका एकत्र लढवणार असल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबतही चर्चा सुरू असून, त्यानंतर लगेच दोन्ही पक्ष याबद्दल घोषणा करणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहे.
काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब यांनी राज ठाकरे यांची घरी जाऊन भेट घेतली होती. ही भेट महापालिका निवडणुकीसंदर्भात होती. याच भेटीवरून आशिष शेलारांनी राज ठाकरेंना डिवचले.
शेलार राज ठाकरेंना म्हणाले चाफा
शिवतीर्थावरील चाफा!!
"चाफा" बोलेना चाफा चालेना... चाफा खंत करी काही केल्या फुले ना...
गेले संजय राऊत घरी...
म्हटली मैत्रीची गाणी...
आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे
गेले अनिल परब सोबती...
गंध दरवळला शिवतीर्थावरी
जुने मतभेद विसरले रे
चल ये रे, ये रे गडया, नाचू उडू घालू फुगडया
खेळू झिम्मा झिम पोरी झिम पोरी झिम !
तरी ही चाफा बोले ना.. चाफा चालेना... चाफा काही केल्या फुले ना !!
(कवी बी यांची क्षमा मागून बंधूप्रितीची ओढ लागलेल्या भयभीत उबाठा सेनेला अर्पण)
असं विडबन काव्य करत शेलारांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली.
शेलार मुंबईला लागलेली बुरशी
शेलारांनी केलेल्या टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उत्तर दिले. देशपांडे यांनीही विडबनात्मक रचना पोस्ट करत शेलारांना मुंबईला लागलेली बुरशी असे म्हटले.
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी पण ही आहे मुंबईला लागेलली बुरशी. नावात आहे शेलार पण हा आहे बोगस मतदानातून निवडून आलेला झोलार, झोलार, झोलार! कविता साभार परत", अशा शब्दात शेलारांनी देशपांडेंनी उत्तर दिले आहे.